पेडण्यात आठवडा बाजार सुरू करा

pedne market
pedne market

प्रकाश तळवणेकर

पेडणे

पावसाळा तोंडावर आला असताना कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेले तीन महिने आठवड्याचा बाजार होऊ भरविण्यात आला नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची ‘बेगमी’ कशी करावी, असा प्रश्न पेडणे तालुक्यातील लोकांना पडला आहे. पेडणे नगरपालिकेने पुढाकार घेऊन हा आठवड्याचा बाजार भरवावा, अशी मागणी ग्राहकांतर्फे करण्यात येत आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाणी असलेल्या पेडणे येथील आठवड्याचा बाजार प्रत्येक गुरूवारी भरत होता. पण टाळेबंदीमुळे तो बंद करण्यात आला आहे.
पर्यटन खात्यातर्फे पेडण्यात आयोजित केलेला शिमगोत्सव १९ मार्च रोजी झाला. या दिवशी गुरुवार व पेडण्याचा आठवड्याचा बाजार होता. पेडण्याच्या आठवड्याच्या बाजाराची व्याप्ती मोठी असली तरी बाजाराला स्वतंत्र अशी जागा नसल्याने वाहतूक अन्य बाजूने वळवून हा बाजार चारकडच्या रस्त्यावरच भरतो. पर्यटन खात्यातर्फे आयोजीत शिमगोत्सवातील चित्र रथ, रोमटामेळ, लोकनृत्य हे याच रस्त्याने जाणारे असल्याने या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत मुख्य रस्ता वगळून अन्यत्र जेमतेम बाजार भरला. बाजार लावण्यात आणि लवकर बाजार काढण्यात वेळ वाया जाईल व ते आपणाला नुकसानकारक ठरेल म्हणून विविध प्रकारच्या बहुतांश विक्रेत्यांनी या दिवशी बाजाराला येणे टाळले. शिमगोत्सवाला अडथळा येऊ नये, म्हणून बाजाराला आलेल्या विक्रेत्यांनाही दुपारीच हलविण्यात आल्याने लोकांना संध्याकाळी सामान खरेदी करता आले नाही. हाच आठवड्याचा शेवटचा बाजार.
२१ व २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर जी टाळेबंदी सुरू झाली. त्यामुळे अद्याप दर गुरुवारी होणारा आठवड्याचा बाजार होऊ शकलेला नाही.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच काही जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागतात. त्यासाठी मिरची, धने, कांदे, हळद, लसूण असे जिन्नस बाजारात विकत घेऊन ते उन्हात सुकवावे लागतात. पावसाळ्यातील वातावरण हे अनिश्‍चिततेचे असते. पाऊस सतत होत राहिला किंवा वादळ वगैरे झाले, तर काहीवेळा घराबाहेर पडणे सुध्दा कठीण होऊन जाते. दुकानेही बंद असण्याची शक्यता असते. अशा वेळी हळसांदे, कुळीथ, उडीद यासारख्या कडधान्याबरोबरच सुकवलेली मासळी, सुंगट (कोळंबी), तसेच शाकारणीसाठी प्लास्टिक अशा अनेक लहान मोठ्या वस्तू या पुरुमेताच्या किंवा आठवड्याच्या बाजाराला लोकांची मोठी गर्दी व्हायची पण कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा आठवड्याचा बाजार बंद असल्याने संपूर्ण तालुक्यातील लोकांचे हाल झाले आहेत.

नगरपालिकेने पुढाकार घ्यावा
पेडण्याच्या या आठवड्याच्या बाजाराला मसाल्याचे जिन्नस घेऊन येणारे हे सावंतवाडी व म्हापशाहून येत. मिरची घेऊन येणारे हे बहुतांश विक्रेते हे जवळच्या सिंधुदुर्गामधील व त्यानंतर पेडणे तालुक्यातील. सुकी मासळी विक्रेते हे पेडणे तालुका, बार्देश आणी सिंधुदुर्गामधील वेंगुर्ला, शिरोडा, मालवण आदी भागातील विक्रेते असतात. नगरपालिकेने स्थानिकांची गरज लक्षात घेऊन पुरुमेताचा बाजार भरावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

गेले दोन अडीच महिने आठवड्याचा बाजार न भरल्याने येत्या पावसाळ्यासाठी लोकांना जीवनावश्यक वस्तूंची बेगमी (पुरुमेत) करता आलेली नाही, याची मला कल्पना आहे. लोकांची ही सोय होण्यासाठी मी नगरपालिकेची बैठक बोलावून बाजारासाठी प्रयत्न करणार आहे.
- सौ. श्वेता कांबळी, नगराध्यक्ष.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com