गोव्यात स्वयंपाकासाठी ९६.५ टक्के स्वच्छ इंधनाचा वापर

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

गोव्यात स्वयंपाकासाठी ९६.५ टक्के लोक स्वच्छ इंधन वापरत असल्याचे राष्ट्र्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून (एनएफएचएस) स्पष्ट झाले आहे.

पणजी: गोव्यात स्वयंपाकासाठी ९६.५ टक्के लोक स्वच्छ इंधन वापरत असल्याचे राष्ट्र्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून (एनएफएचएस) स्पष्ट झाले आहे. तर इंधन वापरात सर्वात जास्त लोक असणाऱ्यांत लक्षद्वीप ९९.८ टक्के, तर केरळ ९८.७ टक्के असे दोन्ही राज्ये अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. या सर्वेक्षणासाठी देशातील १७ राज्य आणि पाच केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश होता. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने हे सर्वेक्षण करून घेतले  आहे. 

एनएफएचएसच्या ४५ टक्के पेक्षा कमी स्वच्छ इंधन वापरणाऱ्या लोकांची संख्या असलेल्या राज्यांमध्ये आसाम (४२.१ टक्के), बिहार (३७.८ टक्के), मेघालय (३३.७ टक्के), नागालँड (४३ टक्के) आणि पश्चिम बंगाल (४०.२ टक्के) यांचा समावेश आहे. एनएफएचएसने केलेल्या सर्वेक्षणात ६.१ लाख लोकांच्या घराद्वारे माहिती संकलीत केली आहे. 

आकडेवारीनुसार, ८० टक्क्यांच्यावर स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन वापरणाऱ्यांमध्ये आंध्र प्रदेश (८३.६ टक्के), मिझोरम (८३.८ टक्के), तेलंगणा (९१.८ टक्के) आणि गोवा (९६.५ टक्के) या राज्यांचा समावेश होतो. सर्वेक्षणामध्ये वीज, एलपीजी किंवा नैसर्गिक वायू आणि बायोगॅस स्वच्छ इंधन म्हणून मानले जातात. १६ राज्यांमध्ये ७० टक्क्यांवर लोक स्वच्छ इंधन स्वयंपाकासाठी वापरतात, हे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक स्वच्छ इंधन वापरणाऱ्यांची टक्केवारी लक्षद्वीपमध्ये (९९.८ टक्के) नोंदली गेली आहे. त्यापाठोपाठ केरळ (९८.७ टक्के) राज्याचा नंबर लागला आहे. तसेच आकडेवारीनुसार, ९० टक्क्यांहून अधिक लोक वीज असणाऱ्या कुटुंबांमध्ये राहत आहेत.

त्याचबरोबर राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुधारित असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. आसाम, बिहार, मणिपूर, मेघालय, सिक्किम, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, मिझोराम, केरळ, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि दमण दिव या राज्यांचा पहिल्या टप्प्यात सर्वेक्षणात समावेश होता. पुढील वर्षी इतर राज्यांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.

आणखी वाचा:

ऐन नाताळात गोमंतकीयांच्या चुलीला गॅस परवडणार नाही

 

संबंधित बातम्या