लाखांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत होणार जमा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

मांडवी नदीत तरंगत्या कसिनोंच्या व्यापार परवान्यांचे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कसिनोंकडून विविध मार्गाने येणारा सुमारे ५२ लाखांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.

पणजी: मांडवी नदीत तरंगत्या कसिनोंच्या व्यापार परवान्यांचे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कसिनोंकडून विविध मार्गाने येणारा सुमारे ५२ लाखांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. राज्य सरकारने कसिनोंना खुले करण्यास परवानगी दिल्याने महापालिकेला पुन्हा एकदा आपली भूमिका मागे घ्यावी लागली असल्याने पुन्हा एकदा पणजीतील नागरिकांना हा विषय चघळायला मिळाला आहे.  

मडकईकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कसिनोंच्या व्यापार परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी काही अटींवर मान्यता दिल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, सरकारनेच कसिनोंना परवानगी दिल्याने महापालिका तरी काय करू शकणार, असा सवाल त्यांनी केला. कसिनो मांडवीतून हटविण्याच्या आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या मागणीनुसार आमची भूमिका ठाम आहे. परंतु मध्यंतरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी मांडवीतून कसिनो हटविण्याची तयारी सुरू केली होती. परंतु स्थानिक ग्रामस्थांनी त्यास विरोध केला आहे. त्यामुळे तो प्रस्ताव मागे पडला, परंतु आम्ही कसिनो हटविण्याबाबत सतत सरकारी दरबारी पाठ पुरवठा करू.

कसिनोंचे व्यापार परवाने रोखता येऊ शकत नाहीत. कायदेशीर बाबी तपासून घेतल्या असल्याने कसिनोवाले त्याविरद्ध न्यायालयात जाऊ शकतात. बांदोडकर मार्गाच्या बाजूला उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांची गर्दी पाहता या ठिकाणांवर पोलिसांची गस्त असावीत यासाठी उद्या शुक्रवारी पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून याठिकाणी गस्त घालण्याची आम्ही विनंती करणार आहोत. ते पुढे म्हणाले की, कसिनोंचा पणजीतील नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता महापालिका घेणार आहे. 

संबंधित बातम्या