'नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणतीही संचारबंदी लावण्यात येणार नाही'

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

पर्यटकांनी सार्वजनिक ठिकाणी आणि मेजवान्यांमध्ये वावरताना शारीरिक अंतर पाळावे. मुखपट्ट्या तसेच  सॅनिटाइजरचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले आहे. 

पणजी- राज्यात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या रात्री संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. पर्यटकांनी सार्वजनिक ठिकाणी आणि मेजवान्यांमध्ये वावरताना शारीरिक अंतर पाळावे. मुखपट्ट्या तसेच  सॅनिटाइजरचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले आहे. 

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्यासाठी लेखी निवेदन दिल्याची माहिती ट्विट करून दिली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, 'सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो लोक गोव्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा सरकारचा विचार नाही. चर्चमधील प्रार्थनासभा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत होतात. जत्रांनाही अत्यल्प उपस्थिती असते. त्यामुळे पर्यटकांनी आपली जबाबदारी ओळखून सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.' 

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले. याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तसे का केले याबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली.

दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. ख्रिसमस नंतरच अनेकांनी राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर तसेच इतर पर्यटन स्थळांवर  गर्दी कऱण्यास सुरूवात केली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ऐनवेळेला काय निर्णय घेते याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. राज्य सरकारने मात्र, सर्व पर्यटकांना दिलासा देत नववर्षाच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या सेलिब्रेशनमध्ये कोणतेही अडथळे न आणण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या