‘गोव्यातील कत्तलखाना पुन्हा सुरू करा’

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

गोव्यातील कत्तलखाना पुन्हा सुरू करून कर्नाटकमधून वृद्ध बैल व म्हशी पुरवठा करण्यावर भर द्यावा, अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

सासष्टी- कर्नाटक राज्यात लागू केलेल्या नव्या कायद्यामुळे कर्नाटकमधील कसायांवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. ज्यामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणात बीफचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मांस पुरविण्यासाठी चर्चा करावी, अन्यथा गोव्यातील कत्तलखाना पुन्हा सुरू करून कर्नाटकमधून वृद्ध बैल व म्हशी पुरवठा करण्यावर भर द्यावा, अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

कर्नाटक सरकारने नवा कायदा लागू करून राज्यातील कसायांवर प्रतिबंध लावला असून ज्यात कसायांवर सोळा वर्षाखलील म्हशी व बैलची कत्तल करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या या कायद्यामुळे कर्नाटक राज्यातून गोव्यात करण्यात येणारा मांस पुरवठा बंद झालेला आहे. याचा थेट फटका मांस विक्री करणाऱ्या व्यवसायिक तसेच मांस खरेदी करणाऱ्या मुस्लिम व ख्रिश्चन बांधवांना बसलेला आहे, असे खासदार सार्दीन यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मांस विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना फटका बसला होता. आता, राज्यात मांस पुरवठा बंद झाल्यास या व्यवसायिकांवर आर्थिक संकट कोसळणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गोव्यात आधी गाय, बैल व म्हशीचे कुठेही कत्तल करण्यात येत असल्यामुळे कत्तलखाना सुरू करण्यात आला होता. पण, हा कत्तलखाना नंतर बंद करण्यात आला. आता कर्नाटक सरकारने लागू केलेल्या कायद्यामुळे गोमंतकीयाना मांस मिळणे कठीण बनल्याने मुख्यमंत्री सावंत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून मांस पुरविण्याची मागणी करावी अन्यथा, गोव्यातील कत्तलखाना पुन्हा सुरू करून कर्नाटक सरकारकडून वृध्द बैल व म्हशी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावा, असे खासदार सार्दीन यांनी सांगितले. 

भारतातून मोठ्या प्रमाणात मांस परदेशात निर्यात करण्यात येत आहे. परंतु, भारत असलेल्या गोवा सारख्या राज्यात मांसचा तुटवडा भासत असल्यामुळे सरकारने यावर त्वरित तोडगा काढावा, असेही त्यांनी सांगितले. 

अर्थमंत्रालयाला निवेदन...

मडगाव तसेच म्हापसा अर्बन बँकमध्ये खातेदरकांचे अडकून पडलेले स्वतःचे पैसे मिळविण्यासाठी डॉक्टर तसेच दवाखान्यातील बिल सादर करण्याची सूचना देण्यात आली असून यामुळे खातेधारकांची सतावणूक होत आहे. खातेधारकांवर बिल सादर करण्याचा पडलेला ताण दूर करण्यासाठी आपण अर्थमंत्रालयाला निवेदन सादर केले असून गोवा सरकारनेही यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी सांगितले.

साखर कारखाना त्वरित सुरू करा

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासंबंधी फक्त चर्चाच करीत असून यासंदर्भात सरकारने अद्याप कुठल्याही प्रकारची कृती केलेली नाही. राज्यात भात शेतीबरोबर अनेक शेतकरी उसाचीही लागवड करतात. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून गोव्यातील एकमेव साखर कारखाना बंद पडल्याने या शेतकऱ्यांना मिळालेले पीक वाया होत आहे. राज्यात उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करून सरकारने साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी केली.

संबंधित बातम्या