'पर्रीकरांनी आश्वासित केलेल्या सांगे आयआयटी प्रकल्पाबद्दल राज्य सरकार उदासीन'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

तत्कालीन मुुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगे आयआयटी प्रकल्पाचे आपल्याला आश्वासन देऊनही राज्य सरकार या प्रकल्पासाठी प्रयत्न करत नसल्याचा आरोप, अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी शनिवारी केला.

पणजी- गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मला सांगे आयआयटी प्रकल्पाचे आश्वासन दिले होते, मात्र हे राज्य सरकार या प्रकल्पासाठी प्रयत्न करत नसल्याचा आरोप, अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी शनिवारी केला. मला विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचेदेखील त्यांनी नमूद केले. यावेळी गावकरांनी पहिल्यांदाच राज्य सरकारविरोधात जाहीरपणे टीका केली.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत अचानक एका मिनिटात या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयआयटी प्रकल्प सांगे येथे नेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी मला सांगितलेही होते. आज जेव्हा तरुण रस्त्यावर उतरतात, त्यात त्यांची चूक नाही. जर तरुणांसाठी चांगल्या योजना आखल्या नाही तर गोव्याचा विकास मागे पडायला जास्त वेळ लागणार नाही, असेदेखील गावकर म्हणाले. 
“राज्य सरकारने आता सत्तारी तालुक्यातील गुळेली येथे आयआयटी नेण्याचा प्रस्ताव दिला आहे, मात्र त्यास स्थानिकांचा आक्षेप आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता पायाभूत प्रकल्पांचे  नियोजन केले तर गोव्याचा विकास कधीही होणार नाही आणि त्यामुळे नागरिकांच्या आंदोलनांचे सत्र  सुरूच राहील”, अशी खंत गावकर यांनी व्यक्त केली. 
असे प्रकल्प सहजगत्या येऊ शकत नाहीत. जेव्हा मला आयआयटी सांगे येथे न्यायचे होते, तेव्हा मी माझ्या मतदारांशी याबद्दल चर्चा केली. काहींनी याला विरोध केला, तर काहींनी त्याला पाठिंबा दर्शविला पण प्रकल्प लोकांपर्यंत नेणे व तो त्यांना विश्वासात घेऊन उभारणे आवश्यक असल्याचेही गावकरांनी यावेळी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या