‘दिवाळीला तरी परत याल ना?’

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

‘दिवाळीला यावर्षी कपडे घेण्यासाठी तरी परत या ना?’ असे म्हणत एका मुलीने टाहो फोडला आणि स्मशानभूमीत एकच आवाज घुमला. राज्यात कोरोनामुळे गेलेल्या ६५६ जणांच्या कुटुंबियांचे प्रतिनिधित्व करणारा हा आवाज होता. ​

पणजी :  काही दिवसांपूर्वी पणजी स्मशानभूमीत दोन मुली ‘पीपीई’ किट घालून आपल्या वडिलांच्‍या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत होते. पार्थिव चितेवर ठेवण्‍यासाठी दोघींना कष्‍ट पडत होते आणि डोळ्यांतूनही अश्रू ढळत होते. भावनांना आवर घालत असतानाच हुंदका फुटला. शेवटी अग्‍नी देण्‍याची वेळ आली आणि त्‍या दोघींनी हंबरडाच फोडला. ‘दिवाळीला यावर्षी कपडे घेण्यासाठी तरी परत या ना?’ असे म्हणत एका मुलीने टाहो फोडला आणि स्मशानभूमीत एकच आवाज घुमला. राज्यात कोरोनामुळे गेलेल्या ६५६ जणांच्या कुटुंबियांचे प्रतिनिधित्व करणारा हा आवाज होता. 

कोरोना महामारीमुळे आपली व आपल्‍या जवळची, परिचयातील अनेकजण कोरोनाचे बळी ठरले. त्यामुळे आता या दिवाळीच्या प्रकाशात कोरोना नष्ट होण्यासाठीची प्रार्थना करीत आहेत. कोरोना महामारीमुळे अंत्‍यसंस्‍कारावर निर्बंध घातले आहे. कुटुंबातील काही मोजकेच सदस्‍य व पूर्ण सावधगिरी बाळगत, पीपीई किट परिधान करून अंत्‍यसंस्‍कारास परवानगी दिली जात आहे. त्‍यामुळे कुटुंबातील सदस्‍य व नातेवाईकांना अंत्‍यदर्शन घेता येत नव्‍हते.

अवघ्या २३ वर्षांची माधुरी यासंदर्भात सांगते की, कोरोना हे एका भयंकर स्वप्नासारखे असल्याचे पूर्वी वाटत होते. प्रचंड भीती होती खूप काळजी घेतली. मात्र, तरीही घरातील कर्ते वडील गेले तेव्हा बसलेल्या धक्क्यातून आम्ही अद्यापही सावरलेलो नाही. बाबांच्याशिवाय आमच्या आयुष्यात आलेली ही पहिली दिवाळी असली तरी आम्हाला सध्या दिवाळी आहे असे वाटतच नाही. 

पणजीचे रहिवासी असणाऱ्या एका तरुणाची आई काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे गेली. घरात दरवर्षी दिवाळी आली की, फराळ तयार करण्यासाठी अथवा घराची साफसफाई आणि सजावट करण्यासाठी आईची लगबग असे. प्रत्येक दिवशी आईची आठवण येते. यंदाच्‍या वर्षी आम्ही दिवाळी साजरीच करणार नाही, असेही तिने सांगितले.

घरीसुद्धा नेले नसल्याची खंत... 
कामाच्या निमिताने माणूस जग फिरला तरी त्याचा मृतदेह त्याच्या मूळ गावी नेण्यासाठीची प्रथा आपल्याकडे आहे. मात्र मृत्यू कोरोनामुळे झाल्‍याने काहीजणांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कुटुंबासह नातेवाईकांनाही वाईट वाटत असल्याच्‍या प्रतिक्रिया व्‍यक्त होत आहेत.
 

संबंधित बातम्या