फोंड्यात राज्यस्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

 फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिर आयोजित २०२०-२१ या सालातील बारावी राज्यस्तरीय महिला फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

फोंडा :  फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिर आयोजित २०२०-२१ या सालातील बारावी राज्यस्तरीय महिला फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवारी १९ डिसेंबर ते गुरुवारी २४ डिसेंबर दरम्यान घेतली जाणार असल्याची माहिती राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राजीव गांधी कलामंदिराचे उपाध्यक्ष शांताराम कोलवेकर, सदस्य सचिव आलेक्‍सो वाझ, कार्यकारिणी समितीचे किरण नाईक, प्रतिभा नाईक, गिरीष वेळगेकर आदी सदस्य उपस्थित होते.

मंत्री गावडे म्हणाले, ‘कोरोना’च्या संकटामुळे राजीव गांधी कलामंदिरातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा गेल्या आठ महिन्याच्या काळात खंडित पडल्या आहेत. ‘कोरोना’च्या काळानंतर ह्या स्पर्धा प्रथमच घेतल्या जात आहेत. महिला फुगडी स्पर्धेसाठी भाग घेणाऱ्या पथकांनी आयोजकांनी घातलेले नियम व अटीचे पालन करणे गरजेचे आहे. या महिला फुगडी स्पर्धेत प्राथमिक फेरीत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश ह्या तत्त्वावर पहिल्या १०० पथकांना प्रवेश देण्यात येईल. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी निर्धारित नमुन्यातील अर्ज २५ नोव्हेंबर २०२० पर्यंतच्या कालावधीत राजीव गांधी कलामंदिर, फोंडा, रवींद्र भवन साखळी, मडगाव व वास्को येथे उपलब्ध असतील. स्पर्धा घेण्यास किमान ३० पथके सहभागी होणे गरजेचे असेल.

 स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क म्हणून रुपये १०० सहित राजीव गांधी कलामंदिर फोंडा येथील कार्यालयात २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत देणे आवश्‍यक आहे. प्रवेश शुल्काची रक्कम कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. प्रत्येक दिवशी प्राथमिक फेरीबरोबर दुपारी २ वाजता सुरू होईल. निर्धारित वेळेत फुगड्यांचे कमीत कमी ३ प्रकार सादर करावे लागतील. एका पथकात कमीत कमी १० तर जास्तीत जास्त १४ महिला कलाकार असतील. 

आकर्षक बक्षिसे...
राज्यस्तरीय महिला फुगडी स्पर्धेत ३० हजार व चषक (प्रथम), २५ हजार व चषक (द्वितीय), २० हजार रुपये व चषक (तृतीय). तसेच उत्तेजनार्थ प्रथम - दहा हजार रुपये, द्वितीय - आठ हजार रुपये, तृतीय - ६ हजार रुपये देण्यात येतील. स्व. किशोरीताई हळदणकर स्मृतिप्रित्यर्थ सहावी अखिल गोवा महिला संगीत नाट्यस्पर्धा ५ ते १० जानेवारी २०२१ या दरम्यान स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संस्थांनी विहित नमुन्यातील प्रवेशिका सविस्तर भरून १८ डिसेंबर संध्याकाळी ४ वाजेपर्यंत राजीव गांधी कलामंदिर येथे पोचत्या करणे आवश्‍यक आहे. 

असून संध्याकाळी साडेचार वाजता संस्था प्रतिनिधींच्या उपस्थितीत नाटक सादरीकरणाचा क्रम ठरवला जाणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट नाट्य प्रयोगासाठी प्रथम - ४० हजार रुपये, द्वितीय - ३५ हजार रुपये, तृतीय - ३० हजार रुपये. उत्तेजनार्थ बक्षिसांमध्ये २० हजार रुपये (प्रथम), १५ हजार रुपये (द्वितीय), १० हजार रुपये 
(तृतीय). 

प्राथमिक फेरीतील  स्पर्धकांसाठी बक्षिसे...
प्राथमिक फेरीतील प्रत्येक दिवसाच्या पहिल्या तीन उत्कृष्ट पथकांना प्रत्येकी रुपये ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जातील. ‘कोरोना’चे संकट लक्षात घेऊन यावर्षी वय वर्षे १० पेक्षा कमी व ६० पेक्षा अधिक असलेल्या कलाकारांना पथकात सहभागी होता येणार नाही.

ऐतिहासिक नाट्यस्पर्धा जानेवारीत
पहिली राज्य राज्यस्तरीय ऐतिहासिक नाट्यस्पर्धा २० जानेवारी २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका कला मंदिर फोंडा कार्यालयात ४ जानेवारीपासून उपलब्ध असतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थेला प्रवेशिका १० जानेवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी साडेचार वाजता नाटक सादरीकरणाचा क्रम ठरवला जाणार आहे. उत्कृष्ट नाट्यप्रयोगांसाठी ४० हजार रुपये (प्रथम), ३५ हजार रुपये (द्वितीय), ३० हजार रुपये (तृतीय), १५ हजार रुपये (चतुर्थ) व या व्यतिरिक्त अन्य सहभागी संस्थेस प्रोत्साहनपर प्रत्येकी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येतील.

संबंधित बातम्या