आता सचिवांनाही कोरोनाची लागण

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

राज्य आरोग्य खात्याच्या संचालक कोरोनातून बरे झाले, आता आरोग्य सेवा खात्याच्या सचिवपदी नव्याने आलेल्या अमित सतिजा यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पणजी : राज्य आरोग्य खात्याच्या संचालक कोरोनातून बरे झाले, आता आरोग्य सेवा खात्याच्या सचिवपदी नव्याने आलेल्या अमित सतिजा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी त्यांच्या आजाराची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असून, ते लवकर यातून बरे व्हावेत, अशी प्रार्थना राणे यांनी केली आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत पाच जण दगावल्याने कोरोनाच्या बळींची संख्या सहाशेच्या पार गेली आहे. 

आरोग्य सेवा संचालनालयाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार आज १ हजार ७१७ जणांच्या नमुण्यांची चाचणी करण्यात आली. २१५ जण पॉझिटिव्ह आढळले असून, घरगुती विलगीकरणात उपचार घेण्यासाठी १८० जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर ४२ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. याशिवाय प्रकृती सुधारल्याने मागील चोवीस तासांत २४१ जणांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ४० हजार ४०९ वर पोहोचली आहे. तर एकूण पॉझिटिव्ह झालेल्यांची संख्या ४३ हजार ४१६ अशी झाली 
आहे.

संबंधित बातम्या