राज्यातील अमलीपदार्थ व्यवहारांवर निर्बंध घालण्यासाठी कायदा सुव्यवस्था कडक करणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

दामोदर नाईक म्हणाले, डॉ. प्रमोद सावंत मार्गदर्शनाखाली वर्षभर सरकारची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. कोविड महामारीच्या काळात आर्थिक चणचण असतानाही मोठ्या हिकमतीने त्यांनी सरकारचा गाडा हाकणे सुरू ठेवला आहे.

पणजी: राज्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पावले टाकणे सुरू केले आहे. अमलीपदार्थ व्यवहाराचा कणा मोडणे सुरू केले आहे. याचमुळे सैरभैर झालेले त्यांच्यावर व भाजप नेत्यांवर बेछूट आरोप करू लागले असल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, डॉ. प्रमोद सावंत मार्गदर्शनाखाली वर्षभर सरकारची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. कोविड महामारीच्या काळात आर्थिक चणचण असतानाही मोठ्या हिकमतीने त्यांनी सरकारचा गाडा हाकणे सुरू ठेवला आहे. राज्य सक्षम करण्याचेही काम ते करत आहेत. सव्वा वर्षात धडाडीने त्यांनी ज्या धडाडीने कायदा व सुव्यवस्था राखली आहे ते अभिनंदनीय आहे.

अमलीपदार्थ व्यवहाराप्रकरणात शैलेश शेट्टी याला अटक करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये तीन कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले गेले होते. संशयितांच्या घरावर छापे टाकण्यापासून त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे काम पोलिस करत आहेत. कळंगुट परिसरातच वर्षभरात दहा छापे टाकण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात पोलिसांनी अमलीपदार्थविषयक २०१९ गुन्हे नोंदवले, २४४ जणांना अटक केली आहे. ६ कोटी ४० लाख रुपयांचा अमलीपदार्थ जप्त केला आहे. यावर्षी १८ ऑगस्टपर्यंत अशाच गुन्ह्यांत ८१ जणांना अटक केली असून ७१ किलो अमलीपदार्थ जप्त केले आहेत. त्याची किंमत ४ कोटी २ लाख रुपये होते. ही कामगिरी पाहिल्यानंतर सरकार अमलीपदार्थांआड कारवाई करते की नाही हे स्पष्ट होते.

एका आमदाराने आपल्या जवळच्या व्यक्तींना हेतूतः सतावले जाते, असे ट्विट केले आहे. ही जवळची व्यक्ती कोण हे त्या आमदाराने स्पष्ट केले पाहिजे असे नमूद करून ते म्हणाले, शैलेश शेट्टी की कपिल झवेरी की झेनिटो कार्दोज हे स्पष्ट व्हावे म्हणजे जनतेला कोण कोणाचा जवळचा ते समजेल. खून झाला तेव्हा कायदा सुव्यवस्था ढासळली असा आरोप केला जातो पण त्या प्रकरणातील मुख्य संशयिताला शरण येण्यास भाग पाडले जाते. पोलिस तपासात सर्व गोष्टी उघड केल्या जात आहेत. सगळ्या प्रकरणांचा छडा लागल्याबद्दल गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. ज्यांनी आजवर अमली पदार्थ व्यवहारांची आपणास पूर्ण माहिती आहे असा दावा केला होता त्यांच्याकडूनही सारे सत्य वदवून घ्यावे. आमदारांचाही यात हात असल्यास सरकारने त्यांच्यावरही कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या