राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा डिचोलीतील पुतळा काळोखात

प्रतिनिधी
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा डिचोलीतील पुतळा सध्या काळोखात पडला आहे. या पुतळ्याजवळील दिवा पेटत नसल्याने रात्रीच्यावेळी या पुतळ्याजवळ अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.

डिचोली: राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा डिचोलीतील पुतळा सध्या काळोखात पडला आहे. या पुतळ्याजवळील दिवा पेटत नसल्याने रात्रीच्यावेळी या पुतळ्याजवळ अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे सध्या रात्रीच्यावेळी सहजासहजी या पुतळ्याचे अस्तित्व जाणवत नाही. मागील बऱ्याच दिवसांपासून पुतळ्याजवळील दिवा नादुरुस्त असल्याची माहिती काही जागृत नागरिकांनी दिली. 

अहिंसक मार्गाने लढा उभारुन इंग्रजांना ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या या महान नेत्याची दरवर्षी शासकीय पातळीवर तसेच शाळा आदी संस्थाकडून गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. मात्र, डिचोली शहरातील त्यांच्या पुतळ्याच्या देखभालीकडे झालेले दुर्लक्ष पाहता, एकप्रकारे हा या महान नेत्याचा अपमानच असल्याची भावना जागृत नागरिकांमध्ये व्यक्‍त होत आहे. येत्या २ ऑक्‍टोबरला साजरी होणाऱ्या गांधी जयंतीपूर्वी तरी पुतळा परिसर पुन्हा प्रकाशमय बनणार काय? असा प्रश्‍न देशप्रेमी नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. 

२ ऑक्‍टोबर १९८० या दिवशी या पुतळ्याचे जुन्या बसस्थानकाजवळ सध्याच्या टपाल कार्यालयासमोर स्थलांतर करण्यात आले आहे. हा पुतळा स्थलांतरीत केल्यानंतर दरवर्षी गांधीजयंतीला पालिका आणि देशप्रेमी नागरिकांकडून या पुतळ्याला म्हणजेच महात्मा गांधीजी यांना अभिवादन करण्यात येते. हा पुतळा म्हणजे काही आंदोलनाचे प्रेरणास्थानही बनले आहे. जुन्या बसस्थानका जवळ हा पुतळा स्थलांतरीत करण्यापूर्वी हा पुतळा बाजारातील केंद्र शाळेजवळील हुतात्मा स्मारकाजवळ होता. पुतळा केंद्र शाळेजवळ होता तेव्हा साधारण चाळीस वर्षांपुर्वी गांधीजयंती आणि अन्य राष्ट्रीय सणांवेळी स्मारक परिसरात केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे साफसफाई करण्यात येत असे.

संबंधित बातम्या