कोविड-19 रुग्णांचा भार कमी करण्यासाठी  स्टेप-अप इस्पितळे ठरताहेत फायदेशीर 

Set up hospital.jpg
Set up hospital.jpg

पणजी  : राज्यातील मुख्य इस्पितळावरील कोरोनाबाधित रुग्णांचा भार कमी करण्यासाठी गोवा सरकारने स्टेप-अप इस्पितळे सुरू केली आहेत. सामाजिक आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने ही स्टेप-अप इस्पितळे सुरू झाल्यानंतर मुख्य  इस्पितळावरील  भार कमी होण्यास मदत झालेली आहे. पाच ते वीसपर्यंतच्या खाटा  या इस्पितळांमध्ये उपलब्ध करण्यात आल्या असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमसारख्या मोठ्या जागेमध्ये स्थापन केलेल्या स्टेप अप इस्पितळामध्ये दोनशे खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. (Step-up hospitals are proving to be beneficial for reducing the burden of Covid-19 patients) 

या इस्पितळांमध्ये 24 तास डॉक्टर, रुग्णवाहिका यांची सेवा उपलब्ध करण्यात आली असून कोरोनाची कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे उपचार केले जात आहेत. डिचोली इस्पितळाने केशव सेवा साधना शाळेमध्ये स्टेप अप इस्पितळ सुरू केलेले आहे. राज्यातील खासगी डॉक्टर या ठिकाणी सेवा देत  आहेत.  

अशा या स्टेप-अप  इस्पितळांमुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची चांगली सोय झाली असून त्यांना थेट म्हापसा, पणजी किंवा मडगाव येथे जावे लागत नाही. आता या स्टेप-अप इस्पितळांच्या  जोडीला गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने कोरोना रुग्णासाठी मदत करणारी कॉल सेंटर सुरू केली आहेत. सत्तरीतील कॉल सेंटर होंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले असून या कॉल सेंटरमध्ये सत्तरीतील शिक्षित युवक-युवती सहभागी झाली आहेत. सत्तरीत जे कोरोना रुग्ण  सापडले आहेत त्यांची माहिती गोळा करून त्यांची ऑक्सिजनची पातळी किती आहे? उष्णता किती आहे? गोळ्या किती आहेत? कोणत्या प्रकारचा त्रास सध्या  त्यांना जाणवत आहे? त्यांना डॉक्टरी उपचारांची गरज आहे का? सल्ल्याची गरज आहे का? हे  सर्व कॉल सेंटरमधील युवक युवती पाहतात. कोरोना रुग्णांच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेतात. कॉल सेंटरमध्ये तैनात ठेवण्यात आलेले दोन डॉक्टर रुग्णांशी चर्चा करून त्यांच्या  शंकांचे  निरसन करतात. त्यांना गरजेचे असलेले उपचार उपलब्ध करतात.  त्यामुळे कोरोना रुग्णांना ही कॉल सेंटर दिलासादायक ठरत आहेत. राज्यातील इतर तालुक्यांमध्येही अशीच कॉल सेंटर सुरू केली जात असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली  आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com