फोंड्यात चोरटी दारू पकडली

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

गोव्याहून मुंबईला नेण्यात येणारी चोरटी दारू फोंडा पोलिसांनी काल रात्री पकडली. पोलिसांनी याप्रकरणी दोन ट्रक ताब्यात घेतले असून एका क्‍लिनरला अटक केली आहे.

फोंडा : गोव्याहून मुंबईला नेण्यात येणारी चोरटी दारू फोंडा पोलिसांनी काल रात्री पकडली. पोलिसांनी याप्रकरणी दोन ट्रक ताब्यात घेतले असून एका क्‍लिनरला अटक केली आहे तर या चोरटी दारू वाहतूकप्रकरणी ट्रकचा मालक व चालक या दोघांचा तपास सुरू आहे. 

काल फोंडा पोलिस गस्तीवर असताना संध्याकाळी जीजे 31 टी 3878 या एकाच क्रमांकाचे दोन ट्रक मंगेशी येथील एका पेट्रोलपंपजवळ पार्क केलेले आढळल्याने पोलिसांनी संशयावरून या ट्रकांची तपासणी केली असता एका ट्रकमध्ये सुमारे सात लाख रुपये किमतीची दारू सापडली.

दोनशे दहा बॉक्‍सेसमध्ये या दारुच्या बाटल्या सापडल्या असून एका बॉक्‍समध्ये बारा व्हिस्कीच्या बाटल्या होत्या. पोलिसांनी तपासावेळी एका ट्रकचा क्‍लिनर अस्लम कासिम शेख (वय 20) याला ताब्यात घेतले. अस्लम हा घाटकोपर - मुंबई येथे राहणारा असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून दोन्ही ट्रकांचे नोंदणी क्रमांक एकच असल्याने ट्रकचा मालक तसेच चालकांचा तपास करण्यात येत आहे. 

ही चोरटी दारू पोलिस निरीक्षक मोहन गावडे तसेच उपनिरीक्षक नीतेश काणकोणकर, सहायक उपनिरीक्षक जीतेंद्र गावडे, हेडकॉन्स्टेबल रोहिदास भोमकर, केदारनाथ जल्मी, वंदेश सतरकर, कॉन्स्टेबल मयूर जांबोटकर, सिद्धेश गावस, राकेश गावकर, राजेश गावडे, मदन गावस व रविकांत सावंत यांच्या पथकाने पकडली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

संबंधित बातम्या