चोरीच्या गाडीने सापडले स्वप्नील वाळके खुनाचे धागेदोरे

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

वाहन चोरी प्रकरणी पोलिसांच्‍या गुन्‍हा अन्‍वेषण विभागातील गुन्‍हे शाखेने एडसन गोन्साल्विस याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून इतरांची नावे व ठावठिकाणा तपास अधिकाऱ्यांना कळाला आणि संशयितांचा माग लागला.

मडगाव: घटना घडलेल्या ठिकाणी बेवारस अवस्थेत आढळलेल्या बोलेरो जीपवरून व सीसीटीव्हीतील फुटेजवरून या प्रकरणाचे धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती आले. संशयित या वाहनातून घटनास्थळी आले होते. त्‍या वाहनाची दोनापावल येथून तीन दिवसांपूर्वी चोरी झाली होती, अशी माहिती पोलिसांच्‍या गुन्‍हा अन्‍वेषण विभागातील गुन्‍हे शाखेला मिळाली. 

वाहन चोरी प्रकरणी पोलिसांच्‍या गुन्‍हा अन्‍वेषण विभागातील गुन्‍हे शाखेने एडसन गोन्साल्विस याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून इतरांची नावे व ठावठिकाणा तपास अधिकाऱ्यांना कळाला आणि संशयितांचा माग लागला. 

पोलिसांच्‍या गुन्‍हा अन्‍वेषण विभागातील गुन्‍हे शाखेचे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना व उपअधीक्षक सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांच्या नेतृत्त्‍वाखाली पोलिस पथकाने या प्रकरणाचा छडा लावण्याची कामगिरी केली. हेडकॉन्स्‍टेबल दिनेश पिकुळकर, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, इरमय्या गुरय्या, नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर व किरण परब यांचा या पथकात समावेश होता.

तिघा निरीक्षकांचा होणार सत्कार
मडगाव येथील खूनप्रकरणातील संशयित घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर कोणतेच धागेदोरे हाती नसताना गुन्‍हा अन्‍वेषण विभागाच्‍या गुन्‍हा शाखा पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांचा रात्रभर शोध घेऊन त्‍यांना २४ तासांच्‍या आत गजाआड केल्याने पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांच्यातर्फे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक दत्तगुरू सावंत, निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्‍यासह पथकातील सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे अभिनंदन
मडगाव खूनप्रकरणातील पाचपैकी तिघा मारेकऱ्यांचा २४ तासांत छडा लावल्याबद्दल पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा व त्यांच्या सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. पोलिसांनी ज्या पद्धतीने ही झटपट कारवाई केली ती वाखाणण्यासारखी आहे. राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस सदोदित अग्रेसर राहतील. त्यांनी अशाच पद्धतीने नेटाने काम करून राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण शून्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. सराफा स्वप्नील वाळके यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांच्या कारवाईनंतर स्तुती करताना व्यक्त केली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या