निदान परीक्षेसाठी तरी खनिज वाहतूक रोखा!

Dainik Gomantak
सोमवार, 25 मे 2020

एवढा काळ बंद असलेला खाण व्यवसाय आता जोरात सुरू असून सर्वच खाण कंपन्यांनी कमी केलेल्या काही कामगारांना कामावर बोलावून कामाला सुरवात केली आहे. खनिज मालाची वाहतूक करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात ट्रकांना जुंपले असून नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या या खनिज वाहतुकीवर पोलिस यंत्रणेने नियंत्रण ठेवण्याची मागणी केली जात आहे.

पाळी

एवढा काळ बंद असलेला खाण व्यवसाय आता जोरात सुरू असून सर्वच खाण कंपन्यांनी कमी केलेल्या काही कामगारांना कामावर बोलावून कामाला सुरवात केली आहे. खनिज मालाची वाहतूक करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात ट्रकांना जुंपले असून नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या या खनिज वाहतुकीवर पोलिस यंत्रणेने नियंत्रण ठेवण्याची मागणी केली जात आहे.
सध्या दहावीची परीक्षा सुरू असतानाही या खनिज मालाच्या वाहतुकीवर कुणाचे नियंत्रण नाही. काही ठिकाणी तर स्थानिकांकडूनच विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरू नये म्हणून खनिज मालवाहू ट्रक अडवले गेल्याने काही खाण व्यवस्थापनांनी खडबडून जागे होऊन आता परीक्षा काळात वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत, मात्र सरकारी यंत्रणेचे अशा प्रकाराकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
दरम्यान, करोडो रुपयांच्या खनिज मालाची वाहतूक आता खाण कंपन्यांकडून सुरू झाली असल्याने या खाण कंपन्यांनी बंद केलेल्या खाण अवलंबितांच्या सुविधा त्वरित सुरू करण्याची जोरदार मागणीही करण्यात येत आहे.
राज्यातील खाण व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे. स्वामित्व धन अदा केलेल्या आणि खाणींवर काढून ठेवलेल्या खनिज मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत आहे. त्यासाठी शेकडो ट्रकांना खाणींवर घेण्यात आले आहे. काही खाण कंपन्यांनी तर ट्रकमालकांना ट्रक दुरुस्तीसाठी आगाऊ पैसेही दिले आहेत. त्यामुळे एकदाचा खनिज माल वाहतूक करा, पण लवकर, असा संदेशच खाण व्यवस्थापनाकडून दिला जात असल्याचे समजते.
यापूर्वी 2018 मध्ये खाणी दुसऱ्यांदा बंद झाल्यानंतर सर्वच खाण कंपन्यांनी आपापल्या कामगारांना कामावरून कमी केले होते. काही नावापुरते कामगार कामावर होते, मात्र आता खनिज मालाची वाहतूक करण्यास सरकारने परवानगी दिल्याने खाणी बिनधास्त सुरू झाल्याच्या अविर्भावात खाण कंपन्यांचे व्यवस्थापन वावरत असून बहुतांश आपल्या मर्जीतील कामगारांना कामावर बोलावून घेण्यात आले आहे.
खाण व्यवसाय सुरू करण्यास कुणाची आडकाठी नाही, मात्र ज्या तऱ्हेने खाण कंपन्यांकडून नियमांची पायमल्ली होत आहे, ते पाहता सरकारी यंत्रणेने या खनिज माल वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्‍यकता व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनीच कान टोचावे...!
गेली साठ वर्षे राज्यात विविध ठिकाणी खाण व्यवसाय सुरू असून खाण मालकांकडून मात्र खाण अवलंबितांना आश्‍वासनाच्या नावावर वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. यापूर्वी काही खाण कंपन्यांनी तुटपुंज्या सुविधा उपलब्ध केल्या. त्यात विद्यार्थ्यांसाठी प्रवासी वाहतूक, पाणी, शालेय साहित्य असे वाटप करण्यात येत होते, पण ही सामाजिक बांधिलकी हे खाण मालक त्यानंतर विसरले. आता नव्या जोमाने खाण कंपन्या कामाला लागल्या आहेत, करोडो रुपयांची उलाढाल होत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या खाण कंपन्यांना बंद केलेल्या या सुविधा त्वरित सुरू करण्यासंबंधी आदेश द्यावा, तशाप्रकारचे एक पत्रच खाण मालकांना पाठवावे, अशी मागणी खाण अवलंबितांकडून करण्यात येत आहे.

 

संबंधित बातम्या