आमचा छळ बंद करा

dainik Gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

मांगोरहिल येथील एका वस्तीत कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून वस्तीतील लोकांना घरातच बंदिस्त केले आहे. त्यामुळे लोकांचा गेल्या एक महिन्यापासून कामधंदा बंद झाला आहे. लोक बरेच संतापले असून आमचा हा छळ बंद करा अशी मागणी करीत पुन्हा एकदा शुक्रवारी सायंकाळी बडा मांगोरहिल आणि गांधीनगर परिसरातील रहिवासी रस्त्यावर उतरले.

मुरगाव
बडा मांगोर आणि गांधीनगर येथील रहिवाशांची कोविड चाचणी करा, जे निगेटिव्ह आढळतात त्यांना ‘कंटेन्मेंट झोन’मधून मोकळे करून कामा धंद्यासाठी त्यांना बाहेर पाठविण्याची परवानगी द्या अशी मागणी रहिवाशांनी शासकीय अधिकाऱ्यांकडे केली.
प्रशासनाने नाहक बडा मांगोरहिल आणि गांधीनगर परिसरातील लोकांना बंदिस्त केले आहे. त्यामुळे तेथील लोकांचे कमाईचे स्त्रोत बंद झाला आहे. खिशात पैसे नसल्याने खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तू वेळेत मिळत नाहीत. यामुळे लोक बरेच चिडले असून रस्त्यावर उतरून ते आपला संताप व्यक्त करीत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी धो धो पाऊस कोसळत असतानाही शेकडो लोक रस्त्यावर उतरून त्यांनी आमचा छळ थांबवावा, कोविड चाचणीत निगेटिव्ह आढळणाऱ्यांना कामाधंद्यासाठी ‘कंटेन्मेंट झोन’बाहेर जाण्यास परवानगी द्या, अशी मागणी केली. यावेळी मामलेदार साईश नाईक यांनी लोकांना समजावून योग्य तो तोडगा लवकरच काढला जाईल, असे सांगितले.

संबंधित बातम्या