माजी मुख्यमंत्री चर्चिल यांचा नावेली मतदारसंघावर डोळा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

बाणावलीत कन्या वालंका आलेमाव यांना उमेदवारी देऊन वालंका यांचे पुन्हा राजकीय लाँचिंग करण्याची तयारीही सुरू आहे. 

मडगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करण्याचे प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री व बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांचा नावेली मतदारसंघावर डोळा असून ते आगामी निवडणूक नावेलीतून लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाणावलीत कन्या वालंका आलेमाव यांना उमेदवारी देऊन वालंका यांचे पुन्हा राजकीय लाँचिंग करण्याची तयारीही सुरू आहे. 

दिवाळीच्या दिवशी चर्चिल आलेमाव यांनी नावेली मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन नावेलीत आपण सक्रीय होणार असल्याचे संकेत दिले. आलेमाव यांच्या या भेटीमुळे नावेलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आलेमाव यांनी नावेलीत पुन्हा एंट्री घेतल्यास नावेलीतील राजकीय समीकरणे बदलतील अशी चर्चा सुरु झाली आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्ताराची मोहीम हाती घेतलेलेल चर्चिल आलेमाव आपली कन्या वालंका यांना बाणावलीतून उमेदवारी देणार असून स्वतः नावेलीतून निवडणूक लढवतील अशी माहिती आलेमाव यांच्या निकटवर्तीयांनी दिली. 

चर्चिल आलेमाव यांनी यापूर्वी २००८ मध्ये नावेलीतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी लुईझीन फालेरो यांचा पराभव केला होता. तथापि, २०१२ च्या निवडणुकीत आलेमाव यांना नावेलीत आवेर्तान फुर्तादो यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. याच निवडणुकीत वालंका आलेमाव यांना काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी दिली होती. तथापि. त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वालंका यांना काँग्रेसची दक्षिण गोव्याची उमेदवारी मिळावी यासाठी चर्चिल आलेमाव यांनी प्रयत्न केले होते, पण या निवडणुकीत रेजिनाल्ड लॉरेन्स यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. वालंका यांना वेळोवेळी या राजकीय संधी हुकल्या असल्या तरी चर्चिल आलेमाव आगामी विधानसभा निवडणुकीत वालंका यांचे राजकीय लाँचिंग करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी ते बाणावली बरोबरच नावेली मतदारसंघातही सक्रीय झाले 
आहेत.

संबंधित बातम्या