वाळपईत वीजदिवे नसल्याने वाहनांची गोवंशांना धडक!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

रात्रीच्यावेळी मुख्य रस्त्यावर गोवंश फिरत असतात. काही गोवंश रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या असतात. वीज दिव्यांचा प्रकाश नसल्याने या गोवंशाचा वाहनचालकाला अंदाज येत नसतो.

वाळपई: वाळपई नगरपालिका क्षेत्रातील वाळपई - पणजी मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वीज दिवे बसविण्यात आले होते. सुमारे शंभरहून अधिक असलेल्या वीज दिव्यांपैकी काही वीज दिवे पेटत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर ठाण मांडलेल्या गोवंशाला वाहनांची ठोकर बसण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

काही वीज दिवे नादुरुस्त असल्याने अशी स्थिती बनली आहे. त्यामुळे काही भागात रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते. त्याचा परिणाम म्हणून रात्रीची वाहतूक करताना वाहतूक धारकांना धोक्याचे बनले आहे. रात्रीच्यावेळी मुख्य रस्त्यावर गोवंश फिरत असतात. काही गोवंश रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या असतात. वीज दिव्यांचा प्रकाश नसल्याने या गोवंशाचा वाहनचालकाला अंदाज येत नसतो. अशावेळी विशेष करून दुचाकीचालकांना वाहन चालविताना या रस्त्यावर बसलेल्या गोवंशाचा अंदाज येत नाही. प्रसंगी काहीवेळेला लहान सहान अपघात होत आहेत. गोवंशावर वाहनाची धडक बसणे हे नेहमीचे बनले आहे. 

आजपर्यंत या नादुरुस्त वीज दिव्यांची दुरुस्ती केलेली नाही. काही वीज दिवे पेटतात. पण जे पेटत नाही ते दिवे सद्या रस्त्यावर अंधाराचे सम्राज्य पसरवीत आहेत. तसेच अन्य काही नागरिक रस्त्यालगतच्या फूट पाथावरून चालतात. त्यांनाही हा अंधार समस्या बनलेली आहे. या वीज दिव्यांची वेळोवेळी पहाणी करुन दिव्यांचे मेंटनन्स राखण्याची आवश्यकता आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. वाळपई मुख्य शहर बाजारपेठ ते नूहा पेट्रोल पंप पर्यंत ही वीज दिवे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बसविले आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या