नियमांचा फज्जा उडतवत गोव्यातील पर्यटक सुसाट...

दैनिक गोमन्तक
रविवार, 27 डिसेंबर 2020

राज्यात काल ख्रिसमस साजरा करण्यात आला. सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याच्या नियमांचा फज्जा उडत असून भविष्यातील कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी कडक कारवाई करणे आवश्यक वाटत आहे. 

पणजी: राज्यात काल ख्रिसमस साजरा करण्यात आला. ख्रिसमस साजरा झाल्यांनतर काही पर्यटक राज्यातून आज सकाळी त्यांच्या घरी माघारी परतले असले, तरी त्याच्या दुप्पट पर्यटक ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी राज्यात येऊ लागले आहेत. राज्यातील हॉटेल्स पुढील ३ जानेवारीपर्यंत फुल्ल  आहेत. मात्र, सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याच्या नियमांचा फज्जा उडत असून भविष्यातील कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी कडक कारवाई करणे आवश्यक वाटत आहे. 

राज्यातील किनारे आणि पर्यटन स्थळे लोकांनी भरलेली आहेत. किनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येत पर्यटक जमा होत असून समुद्रासनासाठी समुद्रात उतरत आहेत.  किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या स्थानिकांची संख्या अगदीच कमी आहे. गेले कित्येक दिवस मंदावलेला हॉटेल व्यवसाय, टॅक्सी व्यवसाय आणि पर्यटनाशी निगडित इतर लहानसहान व्यवसाय आता पुन्हा तग धरू लागले आहेत. अनेक पर्यटकांनी राज्यात येण्यासाठी एक महिना आधीच बुकिंग करून ठेवले आहेत. त्यामुळे जे पर्यटक अचानक येऊ लागले आहेत त्यांना खोल्या मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. 

वाहतूक कोंडीची समस्यासुद्धा जैसे थे आहे. राजधानी पणजीत १८ जून रस्ता आणि दयानंद बांदोडकर मार्गावर वाहतुकीची कोंडी सतत होत आहे. याचा परिणाम राज्यातील अंतर्गत रस्त्यांवरसुद्धा वाहतूक कोंडी होण्यात होत आहे. मिरामार सर्कल येथे आणि पणजीतील मुख्य चर्चच्यासमोर वाहनांची आणि लोकांची वर्दळ खूप वाढली आहे. 

‘वर्क फ्रॉम होम’ काम करणारे अनेक राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून भाड्याने घर घेऊन राहात आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या शिवाय काही लोक आहे ती घरे सोडून कमी पैसे देऊन लहान जागेत राहू लागले. अशा घरमालकांच्या खोल्या, फ्लॅट गेल्या कित्येक दिवसांपासून बंद स्वरूपात होते. सध्या असेच घरमालक त्यांच्या खोल्या किंवा फ्लॅट सर्व साहित्यसकट पर्यटकांना भाड्याने देत असल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे चांगले पैसेसुद्धा मिळत आहेत. एक वन बीएचके फ्लॅट संपूर्ण साहित्यासोबत एका दिवसासाठी ५ हजार रुपये तर दोन बीएचके फ्लॅट संपूर्ण साहित्यसोयाबीत सुमारे ७ ते ८ हजार रुपयांना दिला जात आहे.  जशी पर्यटकांची गर्दी उत्तर गोव्यात आहे, तशीच गर्दी दक्षिण गोव्यातही पाहायला मिळत आहे. काही तारांकित हॉटेलच्या बाबतीत ब्रिटन आणि युकेतील पर्यटकांनी जे बुकींग केले होते ते पर्यटक येऊ न शकल्याने ऐनवेळी येणाऱ्या लोकांना येथे जागा मिळत असल्याचे काहीसे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या