मांगोरहिल परिसरात कडक बंदोबस्त

Dainik Gomantak
मंगळवार, 2 जून 2020

कम्युनिटी ट्रान्समिशन प्रकारातील गोव्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे. ज्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ते टाळेबंदीत कुठेच गेलेले नव्हते, अशी माहिती मिळाली असून या भागातील एक डॉक्टरही कोरोनाबाधित झाले आहेत.

मुरगाव

वास्कोतील मांगोरहिल परिसरातील पाच सदस्यीय कुटुंब आणि एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ माजली आहे. यामुळे वास्को परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सगळीकडे कडक बंदोबस्त करण्यात आला असून सर्व रस्तेही बंद करण्यात आले आहेत.
कम्युनिटी ट्रान्समिशन प्रकारातील गोव्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे. ज्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ते टाळेबंदीत कुठेच गेलेले नव्हते, अशी माहिती मिळाली असून या भागातील एक डॉक्टरही कोरोनाबाधित झाले आहेत. गोवा ग्रीन झोनमध्ये असताना कम्युनिटी ट्रान्समिशनचा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र भीती पसरली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर लगेच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. मांगोरहिल येथील सर्व रस्ते बंद करण्यात आल्या आहेत.
मांगोरहिल परिसर दाटीवाटीने वेढलेला आहे. या परिसरात टाळेबंदीच्या काळात कधीच मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याचे दिसून आले नाही. आजच्या घडीस याच चुकीमुळे कम्युनिटी ट्रान्समिशनचा फैलाव होऊन एका डॉक्टरसह एकाच कुटुंबातील पाच जण कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहे. यात एका गरोदर महिलेचा समावेश आहे.
मांगोरहिल येथील झोपडपट्टी परिसरातील या पाच जणांच्या कुटुंबातील एक व्यक्ती विमानतळावर आणि दुसरी व्यक्ती गृह रक्षकाचे काम करीत आहे, तर त्यांचे आई-वडिल मासळी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यांचा संबंध आल्याने हा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मांगोरहिल येथील ज्या डॉक्टरला हा संसर्ग जडला आहे त्या डॉक्टरने या कुटुंबातील एका व्यक्तीला ताप आल्याने तपासले होते, अशी माहिती मिळाली आहे.
मांगोरहिल भागात डॉक्टरसह सहा कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याचे स्पष्ट झाल्यावर सेंट तेरेझा स्कूल ते वरुणापुरी गेट आणि अंबाबाई मंदिरापर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. आरोग्य खात्यातर्फे परिसरातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या