गोव्यात २.६२ लाखांचे ड्रग्ज जप्त; प्रकरणात एका तरुणीचाही समावेश...

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

अंमलीपदार्थविरोधी कक्षाने म्हापसा व सांताक्रुझ येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी घातलेल्या छाप्यामध्ये २.६२ लाखांचा अंमलीपदार्थ (ड्रग्ज) जप्त केला.

पणजी : अंमलीपदार्थविरोधी कक्षाने म्हापसा व सांताक्रुझ येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी घातलेल्या छाप्यामध्ये २.६२ लाखांचा अंमलीपदार्थ (ड्रग्ज) जप्त केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये एका तरुणीचा समावेश आहे. दोघा संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर एकाला उद्या न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज हळर्णकर यांनी दिली.  पोलिसांनी आज दुपारी दोनच्या सुमारास गिरी - बार्देश येथील सेंट डायगोस चर्चजवळील पार्किंग परिसरात एक तरुण गांजाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाल्यावर या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली.

एक तरुण मितलेश रामचंद्र दास (२१ वर्षे) संशयास्पद फिरत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत केलेल्या झडतीवेळी त्याच्याजवळ १.१०० किलो गांजा सापडला. त्याची किंमत सुमारे १ लाख १० हजार रुपये आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो कामुर्ली - बार्देश येथे राहत असून मूळचा तो बिहारचा आहे. तो इलेक्ट्रिशनचे काम करतो मात्र गेल्या काही महिन्यांपासून काम मिळणे कठीण होत असल्याने त्याने गांजा विक्री करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दाखल करून त्‍याला अटक केली आहे. उपनिरीक्षक मोहन माडगावकर पुढील तपास करत आहे. 

दरम्यान, काल अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सांताक्रुझ येथील रिच बिल्डर्स रेसिडन्सी को-ऑप. सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये छापा टाकला. या छाप्यावेळी फ्लॅटमध्ये तपासणी केली असता ६२५ ग्रॅम गांजा व २० एलएसडीचे  चौकोनी पेपर्स सापडले. या अंमलीपदार्थाची किंमत सुमारे १ लाख ६२ हजार ५०० रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे प्रथमेश मयूर नाईक (२३ वर्षे) व जबीन वेलेन्टीना फर्नांडिस (२२ वर्षे) अशी आहेत. 

१६ महिन्यांत ३ कोटींचा ड्रग्ज जप्त 
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी गोवा अंमलीपदार्थमुक्त करण्यासाठी पोलिसांना कडक पावले उचलण्याच्या सूचना केल्यापासून पोलिस स्थानके, क्राईम ब्रँच, अंमलीपदार्थविरोधी कक्ष अधिक सक्रिय झाले आहे. दरदिवशी अंमलीपदार्थाप्रकरणी गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. अंमलीपदार्थ विक्रेते तसेच दलालांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. 

संबंधित बातम्या