कणकिरे सत्तरीला जोरदार वादळाचा तडाखा; नागरिकांवर कोसळलं आभाळ

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील कणकिरे सत्तरी येथे काल दुपारी वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. यामुळे या भागातील नागरिकांच्या बागायती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गुळेली : गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील कणकिरे सत्तरी येथे काल दुपारी वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. यामुळे या भागातील नागरिकांच्या बागायती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही दिवसांपासून गोव्यात सुरू असलेल्या पावसाचा तडाखा काल गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील कणकिरे सत्तरी या गावाला बसला. काल दुपारी तीनच्या सुमारास हे वादळ झाले. सोसाट्याचा वारा अचानक आल्यामुळे सगळ्यांना काही समजण्याच्या आधीच झाडांची पडझड तसेच घराचे पत्रे, कौले वाऱ्यामुळे उडून गेली, तर माडाचे झाड घरावर कोसळून नुकसान झाले आहे.

महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे गोव्यात रेती वाहतूक करणारे ट्रक ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार यात एक युवक जखमी झाला असून प्राथमिक प्रथमोपचार त्यावर केले आहेत. या भागातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून पोफळीची झाडे मोडून पडली असून ती पाहता या वादळाची तीव्रता लक्षात येते. काल एकूण कणकिरे गावातील सर्व नागरिकांना या वादळाची झळ बसली आहे. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्यात मिनीका गावकर, गोकुळदास गावकर, शिवानंद कुट्टीकर, पार्वती गावकर, वासंती गावडे, किशोर गावडे, अनिल पालकर, गोमती गावडे, हरिश्चंद्र गावकर, कृष्णा गावडे, आश्विन गावकर, शंकर गावकर, प्रेमानंद गावकर यांचा समावेश आहे.अनेकांची कौले उडून गेली आहे तर या मुळे प्रत्येकी सुमारे दहा ते पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेले सर्व नागरीक हे रोजंदारीवर काम करणारे आहे त्याच बरोबर काही विधवा महिलाही असून एकूण या कालच्या आलेल्या संकटामुळे त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे.

गोव्यात 64 गुन्हेगारांच्या तडिपारीसाठी हालचाली सुरू

त्यामुळे सरकारने या नागरिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातून होत आहे. याच बरोबर स्थानिक बागायतदार प्रभाकर गावकर यांच्या बागायतीचे अतोनात नुकसान झाले आहे. बागायती पूर्णपणे भुईसपाट झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते.त्यांच्या पोफळीच्या झाडांची स्थिती पाहता एकूण वादळाची तीव्रता कळते .पोफळी बरोबर केळी व अन्य झाडांचे ही नुकसान झाले आहे. गुळेली ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा स्थानिक पंच नितेश गावडे यांच्या तात्काळ प्रयत्नांनी मामलेदार कार्यालयाच्या वतीने गुळेली ग्रामपंचायतीचे तलाठी राणे तसेच कृषी खात्याचे अधिकारी विश्वनाथ गावस यांनी या ठिकाणी भेट देऊन एकूण नुकसानीचा आढावा घेतला व आपला अहवाल सरकारी यंत्रणेला कळविणार आहे. वाळपई अग्निशमन दलातर्फे या ठिकाणी घरावर पडलेली झाडे हटविण्याचे काम हाती घेतले आहे. जखमी अनिल पालकर याला वाळपई आरोग्य केंद्र प्राथमिक उपचार करुन घरी पाठवण्यात आले असून उद्या गोवा मेडीकल कॉलेज मध्ये जायला सांगितले आहे त्याच्या छातीला मार लागला असून टाके पडले आहेत.

संबंधित बातम्या