ऑनलाईन शिक्षण घेतंय विद्यार्थ्यांचा जीव?

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

केवळ शिक्षणासाठी मोबाईल मिळत नाही म्हणून विद्यार्थी अगदी टोकाचे पाऊल उचलतो ही गोष्ट सर्वच पालकांसाठी आता दक्षता बाळगण्यासारखी बनली आहे. एवढ्या लहान वयात विद्यार्थी एवढे धाडस कसा काय करू शकतो. ही विचार मंथनाची गोष्ट बनली आहे. 

वाळपई- सत्तरी तालुक्यातील पाली गावातील दहावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने काल गुरुवारी मोबाईल मिळत नसल्याच्या कारणावरून घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. मात्र, ही घटना अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. केवळ शिक्षणासाठी मोबाईल मिळत नाही म्हणून विद्यार्थी अगदी टोकाचे पाऊल उचलतो ही गोष्ट सर्वच पालकांसाठी आता दक्षता बाळगण्यासारखी बनली आहे. एवढ्या लहान वयात विद्यार्थी एवढे धाडस कसा काय करू शकतो. ही विचार मंथनाची गोष्ट बनली आहे. 

सत्तरी तालुक्यात गेल्या दोन तीन महिन्यांपासून माध्यमिक शाळेचे शिक्षक वर्ग ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या घरी जाऊन अभ्यासक्रम देत आहेत. ग्रामीण भागात रेंज नसल्याने शिक्षकांनी हा पर्याय निवडला  आहे. शेळप खुर्द सरकारी माध्यमिक शाळेचे शिक्षक अगदी दुर्गम गावात जाऊन मुलांना अभ्यासक्रम देत आहेत. सावर्डे तसेच नगरगाव आंबेडे सरकारी माध्यमिक शाळेचेही शिक्षक वर्ग विविध उपक्रम राबवित आहेत. जेणेकरून विद्यार्थी हा सदैव शिक्षकांच्या संपर्कात राहिलेला आहे. मोबाईलवर केवळ शिक्षणासाठीच नव्हे, तर अन्य खेळ, इत्यादी गोष्टीसाठी विद्यार्थी वर्गाची चटक लागल्याचे चित्र आहे. 

 नगरगाव आंबेडे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गणपतराव राणे म्हणाले, आम्ही सर्व शिक्षक, शिक्षिका मुख्याध्यापक श्रीकृष्ण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. मुख्याध्यापक नाईक यांनी गुगल मीटवर बैठक घेऊन विद्यार्थी वर्गाची वर्गवारी करून ऑफलाईन व लाईन करून व्हॉटस्अप गट तयार केले आहेत. शिक्षकांनी त्या त्या गटावर वेळापत्रक जाहीर केले आहे. शिकविला जाणारा अभ्यासक्रम पाठविला जातो. त्यानुसार अध्यापन चालू आहे. आता ७५ टक्के विद्यार्थी  भ्रमणध्वनी हाताळत असले तरी ५० टक्के विद्यार्थी ऑनलाइन वर्गाला रेंजच्या कमतरतेमुळे हजेरी लाऊ शकत नाहीत. नगरगाव ग्राम पंचायतमधून येत असलेली १७ गावातील ऑफलाईन विद्यार्थ्यांना मुद्रीत लेखन साहित्य शिक्षक त्यांच्या घरी दर गुरुवारी पोचवत आहेत. शाळेत त्यांचे पूर्ण लिहून झाल्यावर तपासणी केली जाते. ओपन बुक ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा याआधी घेण्यात आली आहे. त्याची तपासणी चालू आहे. मोबाईल नसताना देखील विद्यार्थी अभ्यास करून पास होऊ शकतो हे आम्ही सिध्द केले आहे. ज्या पालकांना मोबाईल देणे शक्य नाही त्यांच्या पाल्यांना मोबाईल आवश्यक नाही हे शिक्षक वर्ग  समजवितात. हा अभिनय उपक्रम विद्यार्थांना चांगले मार्गदर्शनासाठी राबविला जात आहे. यंदा परीक्षा होवो न होवोत पुढील शिक्षणासाठी पाया मजबूत होण्यासाठी दर दिवशी काही तरी शिकलेच पाहिजे. याची जाणीव पालक शिक्षक संघाच्या ऑनलाइन बैठकीतून मांडण्यात आलेले आहे. मला वाटते आरोग्य आणि शिक्षण मुलांचं सांभाळून कोरोना महामारीच्या काळात बालकांची प्रगती खुंटणार नाही याची काळजी घेतली जावी त्यासाठी शाळेचा प्रयत्न सुरू आहे. योग, व्यायाम, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, राष्ट्रीय दिवस असे उपक्रम सुरक्षित अंतर ठेवून साजरे केलेले आहेत. त्यातून मुलांना अभ्यासाची गोडी लागून वेगळे विचार येत आहेत.

धावे गावातील पालक गणेश माटणेकर म्हणाले, केवळ मोबाईलवरच शिक्षण अवलंबून नाही. याआधी मोबाईलसारख्या सुविधा नसताना ग्रामीण लोकांनी उच्च शिक्षण प्राप्त केले आहे. सध्याच्या काळात नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत चालले आहे, पण ते जेवढे चांगले तेवढेच धोक्याचेही बनत आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या कलेने घेऊन प्रत्येक गोष्ट समजाऊन सांगितली पाहिजे. नगरगाव आंबेडे शाळेच्या शिक्षकांनी मुलांच्या घरी, एखाद्या मंदिरात जाऊन अभ्यासप्रणाली गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू केली आहे. त्यातून शिक्षक व विद्यार्थी यांच्यात संवाद साधला जात आहे व मुले उपक्रमात रममाण होऊन जातात.
 

संबंधित बातम्या