राज्य नाविन्य मंडळ नावालाच; वेळ नसल्याने विद्यार्थ्यांचे झाले नुकसान

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

विद्यार्थ्यांनी माध्यमिक पातळीवर असतानाही नाविन्याचा शोध घ्यावा म्हणून मंडळाने स्पर्धा घेतली. यात तेलतवंग शोषणारे बायोफिल्टर्स विकसित करण्याचा प्रकल्प कुडचडेच्या न्यू एज्युकेशन इन्स्‍टिट्यूटच्या तनिष्का शेट रायकर हिने प्रकल्प सादर केला.

पणजी: राज्य नाविन्य मंडळाकडे अनेक नवीन संकल्पना राज्यभरातील विद्यार्थ्यांनी सादर केल्या आहेत. मात्र, या कल्पना प्रत्यक्षात व्यवहारात उतरवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने त्यांच्या कल्पना या प्रायोगिक पातळीवरच राहिल्या आहेत. या मंडळाकडे सादर झालेल्या काही संकल्पनांचे स्टार्टअपमध्ये रुपांतर झाले, तरी बहुतांश कल्पना या कल्पनाच राहिल्या असल्याचे मंडळाच्या वार्षिक अहवालावरून दिसते. 

विद्यार्थ्यांच्‍या कष्‍टाचे चीज व्‍हावे
डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राजय नाईक आणि सनथ भरणे या विद्यार्थ्यांनी प्रा. स्वप्नील रामाणी अणि प्रा. अजित साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली लघु कचरा वर्गीकरण प्रकल्प उभारला. त्यामुळे पालिका व पंचायती यांच्यावरील ताण कमी होऊ शकतो. याच महाविद्यालयाच्या तेजस पंडित व रोहित प्रभू या विद्यार्थ्यांनी प्रा. सूरज मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्लास पावडरींग ॲण्ड ग्रेडिंग यंत्र तयार केले. पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारा कचरा गोळा करणारे यंत्र याच महाविद्यालयाच्या सैनिल प्रियोळकर, साईश कारवारकर, दीप्तेश मोरजकर, आफ्रीन खान, अक्षता फातर्फेकर यांनी तयार केले. त्यांना प्रा. सत्येश काकोडकर व प्रा. गौरीश सामंत यांनी मार्गदर्शन केले होते. अशा या कल्पनांच्या आधारे यंत्रांचे उत्पादन सुरू करून त्याचा राज्यभरात वापर सुरू झाला पाहिजे होता. मात्र, त्यासाठीच्या यंत्रणेअभावी या कल्पना केवळ प्रायोगिक तत्वावरच सीमित राहिल्याचे दिसते.

दैनंदिन जीवनात वापर करावा...
विद्यार्थ्यांनी माध्यमिक पातळीवर असतानाही नाविन्याचा शोध घ्यावा म्हणून मंडळाने स्पर्धा घेतली. यात तेलतवंग शोषणारे बायोफिल्टर्स विकसित करण्याचा प्रकल्प कुडचडेच्या न्यू एज्युकेशन इन्स्‍टिट्यूटच्या तनिष्का शेट रायकर हिने प्रकल्प सादर केला. बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार हायस्कूलच्या सनद बेलेगिरी व श्रेयन बुर्ये यांनी आयव्ही थेरपीवर प्रकल्प, शर्वाणी मराठे हिने मत्स्यशेतीसाठी माशांना खाद्य पुरवणारा रोबोट हा प्रकल्प सादर केला. मनोविकास इंग्‍लिश माध्यमाच्या विद्यालयाच्या केयरा फर्नांडिस हिने डिजिटल मार्केटिंगवर प्रकल्प, तर रुबेन हुगो पिन्हेरो याने गतिरोधकावरून जाणाऱ्या वाहनांद्वारे ऊर्जा निर्मिती प्रकल्प, विद्या विकास अकादमीच्या सुहित महांबरे याने अंध व्यक्तींना मार्गदर्शनासाठी अल्ट्रासोनिक सेन्सर प्रकल्प सादर केला होता. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या