मुलांनी रुजवली तजेलदार भाजी

Dainik Gomantak
बुधवार, 20 मे 2020

तळावली बालकल्याण आश्रमाच्या जागेतील उपक्रम

फोंडा

कोरोनामुळे आत्मनिर्भरतेचे महत्त्व आता अधिकच जाणवू लागले आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांना जीवनावश्‍यक वस्तूही उपलब्ध होणे कठीण झाले. आता तर कोरोनाचे रुग्ण वाढतच चालल्याने येणारा काळ कसा असेल, याची कल्पना करणे अशक्‍य ठरले आहे. त्यामुळे स्वतःची गरज कशाप्रकारे भागवता येईल, याचाही विचार आता अधोरेखित होत आहे. विशेषतः भाजीपाला, कडधान्यासाठी मागच्या लॉकडाऊन काळात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्‍वभूमीवर तळावली - फोंड्यातील मातृछायेच्या बाल कल्याण आश्रमातील मुलांनी चक्क आश्रमाच्या आवारात भाजीच्या बियांचे रोपण केले, मशागत केली आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
बालकल्याण आश्रमाचे संचालक श्री. महाबळ यांचे मार्गदर्शन या मुलांना लाभले. बालकल्याण आश्रम समिती सदस्यांनीही याकामी प्रोत्साहन दिले आणि सर्वांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आश्रमाच्या जागेत तांबडी लाल भाजी उगवलेली पाहण्याचा योग या सर्वांना लाभला.
तळावलीतील या आश्रमाच्या जागेत महिन्याभराच्या कालावधीत या मुलांच्या मशागतीने गोमंतकीयांची आवडती तांबडी भाजी रूजली आणि वाढलीही. त्यामुळे ही भाजी थोडथोडकी का असेना पण जेवणात वापरण्यासाठी उपयुक्त ठरली. स्वतः कष्ट करून उगवलेली भाजी पाहून बालकल्याण आश्रमाची मुले तर हरखून गेली होती. थोडे कष्ट आणि नियोजन केले तर प्रत्येकजण अशाप्रकारे थोडथोडका का असेना स्वतःपुरता तरी आत्मनिर्भर होऊ शकेल, हाच संदेश बालकल्याण आश्रमाच्या मुलांनी दिला आहे. या बालकल्याण आश्रमात निराधार मुलांना आश्रय दिला जातो. शिक्षणाबरोबरच निवासाची सोय बालकल्याण आश्रमातून केली जाते, आणि आता तर या मुलांनाही शेती म्हणजे काय आणि त्यासंबंधीचा अनुभवही आला हे महत्त्वाचे.

संबंधित बातम्या