शिक्षणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव अपेक्षित

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

तीन ते सहा वयोगटातील शिक्षण आज महाग झाले आहे. अंगणवाडी ते केजीपर्यंतच्या शिक्षणाची विचित्र अवस्था झाली आहे. केवळ घोकंपट्टी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कार्यकुशलतेला वाव करून देणारे स्वतंत्र स्वायत्त पायाभूत शिक्षण देणे आज महत्त्वाचे आहे.

फोंडा: एकात्म शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार करताना विद्यार्थ्यांच्या कलेनुसार त्यांच्या कलागुणांना आणि रोजगाराभिमुखतेला वाव करून देणारे शिक्षण आज मिळायला हवे. नवीन शैक्षणिक धोरण त्यादृष्टीने उपयुक्त असून फक्त शाळा, विद्यालयांना तशा साधनसुविधा मात्र उपलब्ध व्हायला हव्यात, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा राज्य शिक्षणशास्त्र संस्थेचे माजी संचालक कालिदास मराठे यांनी व्यक्त केले.

मराठी राजभाषा समितीतर्फे सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आज (मंगळवारी) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. खडपाबांध - फोंडा येथील विश्‍व हिंदू परिषद सभागृहात आयोजित या चर्चासत्रात कालिदास मराठे प्रमुख वक्ते  तर अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर उपस्थित होते. व्यासपीठावरील इतर मान्यवरांत मराठी राजभाषा समितीचे पदाधिकारी दिवाकर शिंक्रे, राजाराम जोग व प्रा. कृष्णाजी पाटील उपस्थित होते. चर्चासत्रात विविध शाळा, विद्यालयातील मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी भाग घेऊन आपले विचार व्यक्त केले. 

कालिदास मराठे म्हणाले, तीन ते सहा वयोगटातील शिक्षण आज महाग झाले आहे. अंगणवाडी ते केजीपर्यंतच्या शिक्षणाची विचित्र अवस्था झाली आहे. केवळ घोकंपट्टी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कार्यकुशलतेला वाव करून देणारे स्वतंत्र स्वायत्त पायाभूत शिक्षण देणे आज महत्त्वाचे आहे. मूळात प्राथमिक स्तरावर मुलांना शैक्षणिक धोरणात सामावून घेताना या विद्यार्थ्यांच्या मातापित्यासाठीही मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करणे क्रमप्राप्त आहे. प्राथमिक शिक्षणात आता पाचवीचा अंतर्भाव होत असल्याने सहावी ते बारावीपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या आकलनानुसार त्यांना त्यांच्या बुद्धीमत्तेला आणि त्यांच्या कलेनुसार वाव मिळणार आहे. सध्या भाषिक किंवा गणिती बुद्धीमत्तेवर भर दिला जातो, पण मुलांच्या इतर बुद्धीमत्तेकडे दुर्लक्ष होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात मुलांच्या सर्वंकष बुद्धीमत्तेचा विचार शक्‍य असून नवीन शिक्षण धोरण अवलंबण्यासाठी निर्धारित करण्यात येणाऱ्या समित्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात त्यांच्यात सुसंवाद होणे अपेक्षित आहे. ग्राम शिक्षण समिती, बाल हक्क समिती व पालक शिक्षक संघांत सुसंवाद होताना या समित्या कार्यरत व्हायला हव्यात. मूळात भारतीय भाषांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यानुसारच हे शिक्षण मुलांना मिळायला हवे. 

कस्तुरीरंगन आयोगाने शिक्षणाची व्याख्या स्पष्ट केली आहे, असे सांगून इंग्रजीचे स्तोम रोखताना भारतीय भाषांना प्राधान्य हे मिळायलाच हवे, असे कालिदास मराठे म्हणाले. 
या चर्चासत्रात राजाराम पाटील, अनुराधा मोघे, मकरंद घैसास तसेच मच्छिंद्र च्यारी, नीलेश नाईक, गो. रा. ढवळीकर, कृष्णाजी कुलकर्णी व इतरांनी आपले विचार मांडले तसेच शंकांचे निरसन करून घेतले. सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलनाने या चर्चासत्राला प्रारंभ झाला. स्वागत व प्रास्ताविक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी केले. प्रमुख वक्ते कालिदास मराठे यांचा परिचय शिल्पा ढवळीकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन मच्छिंद्र च्यारी तर गो. रा. ढवळीकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या