विद्यार्थ्यांनी वाहतूक शिस्तीचे धडे इतरांना द्यावेत

विद्यार्थ्यांनी वाहतूक शिस्तीचे धडे इतरांना द्यावेत
Students should be given the lesson of transport discipline

पणजी : वाहतुकीचे नियम समजून घेतले आणि शिस्तीने वाहन चालवले तर अपघात कमी होतील आणि मनुष्यहानी टळेल. म्हणूनच विद्यार्थ्यांनी इतरांना वाहतूक शिस्तीचे महत्त्व पटवून द्यायला हवे, असे आवाहन पणजी वाहतूक पोलिस विभागाचे हवालदार तुकाराम शेट मांद्रेकर यांनी केले.

आल्तिनो-पणजी येथील गोवा कला महाविद्यालयात वाहतूक नियम आणि वाहतुकीतील शिस्त यावर हवालदार शेट मांद्रेकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अपघात घडला की आपल्याला त्याची तीव्रता फार असेल, असे वाटल्याशिवाय राहत नाही. आपला कोणी अपघातात तर सापडला नाही ना, असा विचारही मनात आल्याशिवाय जात नाही. म्हणूनच आपण वाहन चालवताना घरी कोणीतरी आपली वाट पाहणारा असतो, याची खूणगाठ मनात ठेवायला हवी. वाहन चालवताना आपल्याकडे वाहनाचे नोंदणीपत्र, विमा, प्रदूषण नियंत्रण पत्र आणि वाहनचालन परवाना आहे, याची खात्री करून घ्यायला हवी.

दुचाकी चालकाने हेल्मेट घालायलाच हवे. दुर्दैवाने अपघात झाल्यास हेल्मेटमुळे निदान डोक्याला, मेंदुला इजा होणे टळू शकते. चारचाकी वाहनचालकांनी सिटबेल्टचा वापर करायला हवा. काळ्या काचा असू नयेत. वाहन वेगमर्यादा पाळावी. वाहतूकसंबंधीचे सिग्नल पाळावेत. कर्णकर्कश हॉर्न वाजवू नयेत. झेब्रा क्रॉसिंग असेल तिथे काळजी घ्यावी. काही वाहनचालक बेदरकारपणे वाहने हाकतात. सिग्नल तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, हे धोक्याचे असते. समोरील वा बाजूने येणाऱ्या वाहनाला ठोकर बसू शकते, याचे भान वाहनचालकाने ठेवायला हवे. शाळा, इस्पितळ अशा ठिकाणी हॉर्न वाजवू नयेत, वाहनांची गती जिथे नियंत्रित हवी तिथे ती पाळावी. ओव्हरटेक करण्याचा मोह आवरावा, असेही शेट मांद्रेकर यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध सिग्नलची प्रात्यक्षिके दाखवली.


यावेळी हवालदार शेट मांद्रेकर यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक कायद्यातील महत्त्वाच्या कलमांची आणि शिक्षेच्या तरतुदीसंबंधी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. वाहतूकविषयीचे नियम अधिक सोप्या पध्दतीने समजावून सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. अप्लाईड आर्टचे असोसिएट प्रो. विल्फ्रेड गोईस यांनी शेट मांद्रेकर यांचे वाहतूक नियमाविषयीचे जागृतीपर व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात वाहन चालवताना उपयोगात येईल, असे मत यावेळी व्यक्त केले. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com