भाजपचे ज्येष्ठ नेते घेणार कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

निवडणुकीसाठी कार्यकर्ता सर्व बाजुने सज्ज असावा यासाठी  प्रत्येक मतदारसंघातील १०० प्रमुख कार्यकर्त्यांसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते दोन दिवसीय अभ्यास वर्ग घेत आहे. 

मडगाव:  सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरु आहे.  निवडणुकीसाठी कार्यकर्ता सर्व बाजुने सज्ज असावा यासाठी  प्रत्येक मतदारसंघातील १०० प्रमुख कार्यकर्त्यांसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते दोन दिवसीय अभ्यास वर्ग घेत आहे. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड यांच्यासह माजी मुख्यमंत्री लक्षमीकांत पार्सेकर, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी खासदार व भाजपचेराज्य सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर,  माजी आमदार व भाजपचे राज्य सरचिटणीस दामू नाईक, गोविंद पर्वतकर आदी नेते हे वर्ग घेत आहेत. 

उत्तर गोव्यातील मांद्रे, थिवी व हळदोणा, तर दक्षिण गोव्यातील केपे व कुडचडे या मतदारसंघांच्या प्रत्येकी १०० प्रमुख कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग मागच्या शनिवार - रविवारी घेण्यात आले. येत्या शनिवार - रविवारी उत्तर गोव्यातील सहा मतदारसंघांत हे अभ्यास वर्ग घेण्यात येतील. या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात एकूण दहा सत्रे घेण्यात येतात.

 मतदारांशी संपर्क
पक्षाचा मतदारांशी असलेला कनेक्ट तुटू नये याची खबरदारी भाजपचे पक्ष कारभारी घेत आहेत. दिवाळीच्या धामधुमीतही पक्षाकडे असलेला मतदारांचा कनेक्ट कायम राखण्यासाठी घरोघरी पोहे व गूळ भेट देण्याचा उपक्रम भाजपने राबवला. राज्यातील ५० ही जिल्हा पंचायत मतदारसंंघातील प्रत्येक घरात कार्यकर्त्या्ंमार्फत हे भेट पाठवण्यात आली.

संबंधित बातम्या