स्तन कर्करोग रुग्‍णाच्‍या कुटुंबाच्या मानसिकतेवर अभ्यास

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020


डॉ. श्रद्धा पार्सेकर या करीत असलेले अशा पद्धतीचे संशोधन देशात फार कमी ठिकाणी सुरू आहे. जेव्हा या संशोधनातून प्रबंध तयार होईल आणि त्यातून मानसिकतेच्या परिणामकारितेची कारणे व त्यावर उपाय हे पुढे येईल. तेव्हा महिलांमध्ये स्तन कर्करोगाविषयी वाढणाऱ्या गैरसमाजाला आळा घालण्यासाठी मोठी मदत होणार आहे

पणजी : स्तन कर्करोग हा महिलांमध्ये होणाऱ्या आजाराबाबत अजूनही म्हणावी तेवढी देशात जागृती झालेली दिसत नाही. सध्या या रोगाविषयी विविध बाबींवर संशोधन सुरू आहे. गोव्यातील बांदोडा गावातील डॉ. श्रद्धा पार्सेकर या कर्नाटकातील उडपी जिल्ह्यात गेल्‍या काही महिन्यांपासून स्तन कर्करोग झाल्यानंतर त्या महिलेच्या, त्याचबरोबर त्या कुटुंबातील प्रत्येक घटकावर काय परिणाम होतो, त्यांची मानसिकता कशी असते याविषयावर संशोधन करीत आहेत. 

डॉ. श्रद्धा पार्सेकर या करीत असलेले अशा पद्धतीचे संशोधन देशात फार कमी ठिकाणी सुरू आहे. जेव्हा या संशोधनातून प्रबंध तयार होईल आणि त्यातून मानसिकतेच्या परिणामकारितेची कारणे व त्यावर उपाय हे पुढे येईल. तेव्हा महिलांमध्ये स्तन कर्करोगाविषयी वाढणाऱ्या गैरसमाजाला आळा घालण्यासाठी मोठी मदत होणार आहे. डॉ. श्रद्धा पार्सेकर यांनी २०००-०५ या दरम्यान गोव्यात बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अॅण्ड सर्जरी (बीएचएमएस) ही पदवी घेतल्यानंतर काही दिवस गोव्यातील रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली. त्यानंतर २००८ ते २०१२ पर्यंत मडकई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावली. त्यादरम्यान पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये हॉस्पिटल हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा केला. दिल्लीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअरमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण व्यवस्थापनचा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केला. 

सन २०१२-१४ ला मणिपालमध्ये मणिपाल विद्यापीठात पब्लिक हेल्थचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर श्रद्धा यांनी २०१६ ते २०२० मणिपाल अकॅडमीमध्ये डॉक्टरेट पदवीसाठी संशोधन करीत आहेत. त्यांच्या मते कर्नाटकातील ग्रामीण क्षेत्रात कमी प्रमाणात स्तन कर्करोग असलेल्या महिला आढळतात, पण त्याचे परिणाम मात्र अतिदाहक आहेत. या रोगावर उपचारासाठी खर्च मोठा येतो अशी भावना निर्माण झाल्याने त्यावर उपचार करण्याचे टाळले जाते. त्याचा परिणाम कुटुंबाला पुढे सोसावा लागतो. 

रोगातून वाचलेल्‍यांचाही 
गुणात्‍मक अभ्‍यास

स्तन कर्करोगाविषयी त्यांनी सांगितले की, सन २०१७ मध्ये याच आजारावर कर्नाटकातील स्तन कर्करोगातून वाचलेल्या अनुभवांबद्दल आणि गरजांवर गुणात्मक अभ्यास केला. सध्या आपण करीत असलेल्या अभ्यासातून कर्करोग झालेल्या महिला रुग्णांपासून त्या कुटुंबातील प्रत्येक घटकांचा, त्याशिवाय जवळ राहत असलेल्या नातेवाईकांचाही या रोगाविषयी काय भावना आहेत, हे समजून येते. स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतर, त्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्ण महिलेस पूर्वत होण्यासाठी दोन वर्षांचा तरी कालावधी लागतो. तोपर्यंत या रोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार बदलत जातो. आपण करित असलेल्या संशोधनास कॉलिटेटिव्ह असे म्हणतात. 

अनेकजण करणार हेटाळणी
अनेक कुटुंब अशा रुग्णांची हेटाळणीही करतात, असे अभ्यासांती जाणून येत असल्याचे सांगत डॉ. श्रद्धा पार्सेकर सांगतात अशा संशोधनाला फार खर्च येतो. सध्या आपण संशोधक अधिकारी काम करून आणि मणिपाल विद्यापीठाकडून फिलोशीप मिळवून खर्च करीत आहे. केंद्रीय आरोग्य खात्याकडे आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे संशोधनासाठी आर्थिक मदतीसाठी अर्ज केला होता. पण तो अर्ज फेटाळण्यात आला. सध्या मणिपाल येथे वैद्यकीय शास्त्र आणि पॅरामेडिकच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे, त्याशिवाय दिल्ली व मंगळुरु येथील दोन विद्यार्थी आपल्याकडे इंटर्नशिप घेत आहेत. 

प्रबंधाची जागतिक दखल
डॉ. श्रद्धा यांनी त्यांचे सहकारी यू.एन. यादव (ऑस्ट्रेलिया), बी. रयामझी (नेपाळ), एस. के. मिस्त्री (बांगलादेश), एस. के. मिश्रा (नेपाळ) यांच्या मदतीने कोविड-१९ च्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूच्या कारणांविषयी सादर केलेले प्रबंधाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. २५ सप्टेंबर २०२० मध्ये हा अल्प मध्यम व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत कोविड-१९ (साथीचा रोग) या आजारामधील गैर संसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापनावर दृष्टीकोन टाकणारा मार्ग (Syndemic Perspective on the mangement of Non-communicable Diseases Amid the COVID-19 Pandemic in low and Middle Income contries.) हा प्रबंध सादर झाला 
आहे.

संबंधित बातम्या