सुभाष केरकर यांचा पक्ष नेतृत्वाला कंटाळून राजीनामा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

मोठी परंपरा असलेला कॉंग्रेस हा पक्ष मी आणि आमचे कुटुंब हे गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेसशी निगडीत आहोत. म्हणून हा निर्णय घेताना मला दुःख होत आहे.

पेडणे: पक्ष नेतृत्वाच्या कारभाराला कंटाळून आपण कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व, प्रदेश कॉंग्रेस समिती व गोवा प्रदेश समितीच्या सरचिटणीस पदाचा आपण राजीनामा दिला आहे, अशी माहिती सुभाष केरकर यांनी  त्यांच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासह पेडणे काँग्रेस गट समितीचे उपाध्यक्ष प्रशांत आरोलकर व खजिनदार दिवाकर जाधव उपस्थित होते.

मोठी परंपरा असलेला कॉंग्रेस हा पक्ष मी आणि आमचे कुटुंब हे गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेसशी निगडीत आहोत. म्हणून हा निर्णय घेताना मला दुःख होत आहे. गोव्यातही अनेक कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.पण येथील कॉंग्रेस नेतृत्वाला असे लोक नकोत. त्यांना खूष-मस्करे व अन्य प्रकारे फायदा करून देणारे लोक पाहिजेत. गोवा राज्य कॉंग्रेस अध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांची नियुक्ती होऊन अडीच वर्षे उलटली. एक बहुजन समाजातील व्यक्ती प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने पक्ष चांगली उभारी घेईल म्हणून आनंद झाला होता. यापूर्वी आम्ही अनेक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची कारकीर्द पाहिली. पण गिरीश चोडणकरांइतकी कुणाची अपयशी कारकिर्द पाहिली नाही. पक्षाची कारकीर्द कधीच इतकी खालावलेली नव्हती. पक्षाने चांगली उभारी घ्यावी म्हणून मी त्यांना प्रत्येक मतदारसंघात दोन महिन्यांनी गट समितीशी एक तरी बैठक घ्यावी, माझे चोडणकर यांना आव्हान आहे की दोन महिन्यांतच नव्हे तर दोन वर्षात अशी एखाद्या मतदारसंघात  एक तरी बैठक घेतल्याचे त्यांनी दाखवून द्यावे.

पक्षाची ध्येय-धोरणे घेऊन पक्ष पुढे जात नाहीत. सद्याची कॉंग्रेसची वाटचाल पाहिल्यास या लोकांनी पक्षास भवितव्यच  ठेवले आहे, असे  वाटत नाही. यानंतर काय हे अद्याप आपण काहीही ठरवले नाही. पेडणे मतदारसंघातील कार्यकर्त्यांना याची आपण कल्पना दिल्याचे सुभाष केरकर यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या