म्हापसा नगरपालिकेचा निधी भलतीकडेच वळवण्यामागे राजकारण; सुधीर कांदोळकरांचा आरोप

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

सुधीर कांदोळकर म्हणाले, की पालिकेचा पैसा अन्य कामासाठी वळवण्याचा हा प्रकार खरोखरच आश्चर्यकारक आहे. सध्याच्या पालिका कार्यालयाच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत पालिकेची प्रशासकीय इमारत उभारण्याचा ठराव म्हापशाच्या आमदारपदी फ्रांसिस डिसोझा असताना पालिकेने एकमताने संमत केला होता.

म्हापसा: नगरपालिकेच्या आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी म्हापसा पालिकेने अलीकडेच चौदाव्या वित्त आयोगाने मंजूर केलेले अनुदान वाहतूक खात्याच्या बसस्थानक प्रकल्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांनी केला आहे.

म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, की पालिकेचा पैसा अन्य कामासाठी वळवण्याचा हा प्रकार खरोखरच आश्चर्यकारक आहे. सध्याच्या पालिका कार्यालयाच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत पालिकेची प्रशासकीय इमारत उभारण्याचा ठराव म्हापशाच्या आमदारपदी फ्रांसिस डिसोझा असताना पालिकेने एकमताने संमत केला होता. सध्या पालिकेच्या दृष्टीने प्रशासकीय इमारत अतिशय महत्त्वाची आहे. कारण, पालिका मंडळाच्या बैठका घ्यायलाही या पालिकेकडे पुरेसे सभागृह नाही, अशा परिस्थितीत पालिकेने कुणाच्या तरी सांगण्यावरून सुमारे ३.२२ कोटींचा निधी भलतीकडे वळवणे योग्य नाही, असेही श्री. कांदोळकर म्हणाले.

प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी या पूर्वी जारी करण्यात आलेल्या निविदेला कुणी कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नाही, याचे कारण म्हणजे कंत्राटदारंना पालिकेकडू्न वेळेवर पैसे दिले जात नाहीत, असा दावाही त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके, सचिव भोलानाथ घाडी यांची उपस्थिती होती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या