कुर्टी-खांडेपार उपसरपंचपदी सुधीर राऊत

अवित बगळी
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या उपसरपंचपदासाठी तिसऱ्यांदा निवड झाली असून, यावेळेला अखेर सुधीर राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पंचायतीच्या सरपंचपदी गेल्याच महिन्यात श्रावणी गावडे यांची निवड झाली होती. या पंचायतीचे उपसरपंच भिका केरकर यांच्याविरोधात अविश्‍वास दाखल झाल्यानंतर उपसरपंचपद रिक्त झाले होते.

फोंडा
कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या उपसरपंचपदासाठी तिसऱ्यांदा निवड झाली असून, यावेळेला अखेर सुधीर राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पंचायतीच्या सरपंचपदी गेल्याच महिन्यात श्रावणी गावडे यांची निवड झाली होती. या पंचायतीचे उपसरपंच भिका केरकर यांच्याविरोधात अविश्‍वास दाखल झाल्यानंतर उपसरपंचपद रिक्त झाले होते. त्यासाठी आज (बुधवारी) उपसरपंच निवडीसाठी बैठक घेण्यात आली असता सुधीर राऊत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दादी नाईक वगळता इतर सर्व पंच उपस्थित होते. गटविकास कार्यालयाचे रवींद्र नाईक यांनी कामकाज हाताळले, पंचायत सचिव रुपेश हळर्णकर यांनी सहकार्य केले. 
सध्या उपसरपंचपदी निवड झालेले सुधीर राऊत हे पूर्वी मगो गटाचे होते. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजप गटाला समर्थन दिले होते. भाजपला समर्थन दिले तरी मगोशी बांधिलकी तोडली नसल्याने आता मगोचाच उपसरपंच झाल्याचे मगोच्या नेत्यांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे कुर्टी - खांडेपार पंचायतीवर भाजपचा सरपंच आणि उपसरपंच असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 
दरम्यान, उपसरपंच सुधीर राऊत यांचे भाजपचे फोंड्यातील नेत्यांनी व मगोचे फोंड्यातील डॉ. केतन भाटीकर यांनीही आपापल्यापरीने अभिनंदन केले आहे. सुधीर राऊत हे मगोचेच कार्यकर्ते असल्याचे केतन भाटीकर यांचे म्हणणे असून इतर मगो समर्थक पंचांचेही समर्थन मिळाले आहे.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या

Tags