काटकसरीची उपाययोजना न केल्यास सरकारवर व्याजासह नुकसान भरपाई देण्याची वेळ: सुदिन ढवळीकर

अवित बगळे
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

सुदिन ढवळीकर म्हणाले, सरकारने अद्यापही काटकसरीची उपाययोजना सुरू केलेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यातच कित्येक कर्मचाऱ्यांना या महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. असे असतानाही इतर मंत्र्यांच्या खात्यातील कामांच्या निविदा मात्र जारी करण्यात येत आहेत.

पणजी: गोवा सरकार विविध कंत्राटदारांचे एक हजार कोटी रुपये देणे आहे. हे देणे सरकारने न फेडल्यास सरकारवर व्याजासह ही रक्कम आणि भरपाईही  देण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा आमदार सुदिन ढवळीकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिला. ढवळीकर हे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.

ते म्हणाले, सरकारने अद्यापही काटकसरीची उपाययोजना सुरू केलेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यातच कित्येक कर्मचाऱ्यांना या महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. असे असतानाही इतर मंत्र्यांच्या खात्यातील कामांच्या निविदा मात्र जारी करण्यात येत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता आम्ही डिसेंबर पुढील कामाचे आदेश आता देत आहोत असे ते सांगतात. हा डिसेंबर नव्हे तर पुढील डिसेंबरपर्यंत कामे करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत हे सत्य आहे. राज भवनाचे काम करण्यासाठी सरकारकडे दोन कोटी रुपये नाहीत. रस्त्यांचे हॉट मिक्स केलेले पैसे अद्याप देणे आहेत. 

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तंत्रज्ञानाचे साडेचारशे कोटी रुपये, गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या कंत्राटदारांचे दीडशे कोटी रुपये याशिवाय जलसंपदा खाते, वीज खाते यांच्या कंत्राटदारांचे मिळून एक हजार कोटी रुपये सरकार देणे आहे. हे कंत्राटदार न्यायालयात गेले तर व्याजासह त्यांना ते पैसे द्यावे लागतील, याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अधिक 20 टक्के भरपाई द्यावी लागणार आहे, ते सरकारने ध्यानात ठेवावे. वीज, पाणी यांची भरमसाठ बिले आलेली आहेत ती सरकारने कमी करावीत. महामारीच्या काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, धंदे बंद पडले आहेत, लोकांच्या हातात पैसे नाहीत. त्यांना कसे जगावे हा प्रश्न आहे. ही स्थिती पालटण्यासाठी योग्य ती उपाययोजना सरकारने करावी, अन्यथा गोव्यात येणार्याा काळात नको ते घडायला वेळ लागणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या