साखर कारखाना कायमचा बंद

Dainik Gomantak
मंगळवार, 5 मे 2020

पाच वर्षात पिक बदल करण्यास सरकार मदत करेल यावरही चर्चा झाली आहे.तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे मागितला आहे.

पणजी

सरकार यापुढे साखर कारखाना चालवणार नसल्याचे आज स्पष्ट झाले. येत्या पाच वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दुसऱ्या नगदी पिकाकडे वळावे, सरकार संजीवनी सहकारी साखर कारखान्यासाठी करत असलेली मदत थेटपणे शेतकऱ्यांना या नव्या पिकासाठी करेल अशी चर्चा आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत झाली आहे.
या बैठकीला कृषी खात्याचा पदभार असलेले उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई आणि सांग्यातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या बैठकीनंतर फळदेसाई म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ६०० रुपयांचा पहिला हप्ता मिळालेला नाही. चार महिने शेतकरी याची प्रतिक्षा करत आहे. हे पैसे देण्यासाठी सरकार प्रयत्न करु असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पाच वर्षात पिक बदल करण्यास सरकार मदत करेल यावरही चर्चा झाली आहे.तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे मागितला आहे. दरवर्षी कारखान्यावर १० कोटी रुपये खर्च करणे व्यवहार्य ठरणार नाही असेही या बैठकीत ठरवण्यात आले आहे.
दरम्‍यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, लोकशाहीत सरकारकडे मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कोरोना विषाणूच्या टाळेबंदीमुळे प्रत्येकाला आपले आर्थिक नुकसान झाले असे वाटते. त्यांना हेही माहित आहे की सरकारच्या मर्यादा काय आहेत. हा केवळ गोव्याचा वा देशाचा नव्हे तर जगाचा प्रश्न आहे. त्यातून बाहेर येण्यास काही वेळ निश्चितपणे लागेल. प्रत्येकाचे समाधान करता येत नाही. सरकार कोणत्या पद्धतीने जनतेला मदत करेल हे सरकार ठरवेल. प्रत्येकाने केलेल्या मागण्यांवरून मदत देण्याची पद्धत सरकार ठरवू शकते.

संबंधित बातम्या