गुरांचे खाद्य म्हणून उसाची विक्री!

प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

पेडण्यात उसाच्या मळ्यात काजू आंबा कलमे लावण्यास सुरवात

पेडणे: संजीवनी सहकार कारखाना बंद करण्याचा निर्णय झाल्यावर सध्या ऊस पीक घेत असलेले शेतकरी चिंतीत झालेले असून काही शेतकऱ्यांनी गुरांच्या खाद्यासाठी ऊस विकणे सुरू केले आहे, तर काही शेतकऱ्यांनी या अशा मळ्यात काजू, आंब्याची कलमे लावण्यास प्रारंभ केला आहे.
 
पेडणे तालुक्यात उसाचे पीक घेणारी गावे म्हणजे इब्रामपूर, वझरी, नागझर वझरी, दाडाचीवाडी - धारगळ, तोर्से, मोप, कोरगाव आदी भागातून सुमारे ५५ हेक्टर जमिनीत उसाच्या पिकाचे उत्पन्न घेतले जात असे. प्रारंभी तोर्से, मोप व इब्रामपूर भागात जलसिंचन खात्याच्या लिफ्ट इरिगेशनद्वारे पाणीपुरवठा करून ऊस लागवडीसाठी प्रारंभ झाला. २०१० मध्ये तिळारीचे पाणी पाटाद्वारे सुरू झाले. उसाच्या शेतीद्वारे जास्त फायदा मिळेल म्हणून काही शेतकऱ्यांनी ज्या जमिनीत प्रामुख्याने पारंपरिक भातशेती केली जायची अशा जमिनीत शेतकऱ्यांनी उसाची शेती करण्यास सुरवात केली. भातशेतीची काही जमीन पडीक होती. शेतकऱ्यांनी अशी जमीन ऊस लागवडीखाली आणली. काही जणांनी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन भाडेपट्टीवर घेतली. सरकारी योजनेद्वारे उपद्रवी प्राण्यापासून शेतीच्या रक्षणासाठी फॅंसींग वायर लावली, प्रशिक्षण घेतले.

हे असे सगळे शेतकरी व त्यांचे कुटुंबीय उत्साहात उसाच्या मळ्यात काम करायचे. ऊस तोडणीसाठी योग्य झाल्यावर मजूर आणून ऊस तोडणी होऊन ऊस संजीवनी सहकार साखर कारखान्यात पाठविण्यात येत असे. उसाच्या शेतीत हे शेतकरी समरस होत असतानाच  मध्येच संजीवनी सहाकारी कारखाना बंद करण्याचा विचार होऊ लागला आणि या कारखान्याचा हंगाम संपल्यानंतर परत हा कारखाना जेव्हा सुरू व्हायला हवा होता तो सुरूच झाला नाही.
येथील ऊस उत्पादकांना तर स्वतः मेहनत घेऊन घेतलेल्या पिकाचे काय करायचे असा प्रश्न होता. सगळीकडून मोठा दवाब आल्यानंतर कारखान्याने शेतकऱ्यांकडील ऊस खरेदी करून दुसऱ्या राज्यातील कारखान्यांना विकला व शेतकऱ्यांना मालाची रक्कम दिली हे चांगले केले. ही चांगली गोष्ट असली तरी यानंतर पुढे आपल्या भवितव्याचे काय असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. आपल्या संजीवनी सहकारी कारखान्याच्या विश्वासार्हतेवर पूर्वीची शेती सोडून हे पीक घेण्यास सुरवात केली. ज्या शेतकऱ्यांनी ऊस लागवड व्यवसाय स्वीकारताना मोठी स्वप्ने पाहिली अशा शेतकऱ्यांमध्ये संजीवनी  सहकार कारखाना व सरकार यांच्याबद्दलच्या विश्वासार्यतेला मोठा तडा गेला आहे. अशा या परिस्थितीत सापडलेल्या काही शेतकऱ्यांनी दुसरा उपाय नसल्याने ऊस गुरांचे खाद्य म्हणून विकावा लागला व विकतात. तरीही संजीवनी साखर कारखाना सुरू होइल या आशेवर ऊसाचे उत्पन्न घेणे सुरूच ठेवले. तालुक्यातील एकूण साठ ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी वीस शेतकऱ्यांनी उसाची शेती बंद केली आहे. त्यातील काही शेतकऱ्यांनी काजू, आंब्याची कलमे लावण्यास प्रारंभ केला आहे. काही शेतकऱ्यांनी परत भात शेतीकडे वळण्याचे ठरविले आहे.

शहरी बाबूचे शेतीप्रेम...
वास्को शहरातील सुरेंद्र मडकईकर हा एक युवक. त्याला शेतीची काहीही माहिती नव्हती. ना कधी हातात नांगर धरला किंवा ना कधी फावडे हातात घेतले होते, पण शेतीची आवड होती. बेळगाव, कोल्हापूर आदी ठिकाणी फिरताना उसाचे मळे बघून त्याला आणखी प्रोत्साहन मिळाले. २०१४ च्या सुमारास पेडणे तालुक्यात उसाचे मळे पाहून त्याने आपणही उसाची शेती करायची असे मनात ठरविले. त्यानंतर सुरेंद्रने वझरी येथे पडिक असलेली शेतीची जमीन लीजवर घेतली. मोठ्या आनंदाने तो स्वतः उसाच्या शेतीत पाणी लावणे, नडणीची खुरटणी अशी लहान मोठी कामे करू लागला. सगळे काही व्यवस्थित सुरू होते आणि संजीवनी सहकारी कारखाना बंद होणार असल्याचे जाहीर झाले. त्यामुळे आता घेतलेल्या उत्पन्नाचे काय करावे. गुंतवणूक केलेली रक्कम कशी काय उभी होइल. अशा अनेक समस्या या शहरीबाबू पुढे उभ्या राहिल्या आहेत.

संबंधित बातम्या