'सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन कोरोना स्थितीवर अवलंबून

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

पर्सेप्ट लिमिटेड कंपनीतर्फे पुढील महिन्यात डिसेंबरच्या अखेरीस २७ ते २९ असे तीन दिवस ‘सनबर्न महोत्सवा’ला सरकारने तात्पुरता परवाना दिला आहे. हा महोत्सव राज्यातील कोरोना महामारीच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जर ही स्थिती त्या काळात नियंत्रणाखाली असल्यास हा महोत्सव आयोजित केला जाईल.

 पणजी: पर्सेप्ट लिमिटेड कंपनीतर्फे पुढील महिन्यात डिसेंबरच्या अखेरीस २७ ते २९ असे तीन दिवस ‘सनबर्न महोत्सवा’ला सरकारने तात्पुरता परवाना दिला आहे. हा महोत्सव राज्यातील कोरोना महामारीच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जर ही स्थिती त्या काळात नियंत्रणाखाली असल्यास हा महोत्सव आयोजित केला जाईल. मात्र, हे प्रमाण वाढलेले असल्यास तो होणार नाही, असे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हरिंद्र सिंग यांनी स्पष्ट केले. 

या सनबर्न महोत्सवासाठी एक महिन्यापूर्वीच वागातोर येथे तयारीला सुरवात झाली आहे. या महोत्सवासाठी उभारण्यात येणारे तेथील व्यासपीठ तसेच दालनांचे काम स्थानिकांनाच देण्यात आले आहे. याशिवाय या महोत्सवामुळे टॅक्सी, हॉटेल्स, बार व रेस्टॉरंटस् तसेच इतर स्थनिकांना यातून रोजगार मिळतो. या महोत्सवासाठी केंद्र व राज्य सरकारकडून परवान्यासाठी आवश्‍यक असलेले दस्ताऐवज देण्यात आले आहेत. हा परवाना तात्पुरता आहे. मात्र, महोत्सवाची तयारी कंपनीतर्फे ठेवण्यात येणार आहे. कोरोना स्थिती जर त्यावेळी सुधारलेली असल्यास अचानक हा महोत्सव करणे शक्य नाही. त्यामुळे पूर्वतयारी ही करावीच लागते. या महोत्सवासाठीची तिकीट सेवा सुरू करण्यात आली आहे. कारण ज्यांना यायचे आहे त्यांना त्यांचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. सनबर्न महोत्सव हा ठरल्यानुसार व्हावा की नाही याचा अंतिम निर्णय सरकार आयोजनाच्या काही दिवस अगोदर घेणार आहे. त्यामुळे हा महोत्सव सरकार जो निर्णय त्यावेळी घेईल त्यावर अवलंबून आहे. कोरोना स्थिती ठरलेल्या तारखांच्या काळात कशी असेल याचे भाकीत कोणीही सांगू शकत नाही. कोरोनामुळे आरोग्य सुरक्षितता राखणे हे महत्त्वाचे आहे व त्याचे प्रमाण वाढू लागल्यास कंपनीच हा महोत्सव करणार नाही, असे हरिंद्र सिंग यांनी या महोत्सवाबाबत राजकारण्यांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना सांगितले.  

कोरोना महामारीमुळे यावेळी सनबर्न महोत्सवासाठी नेहमीपेक्षा खूपच कमी उपस्थिती ठेवण्यात येणार आहे. सुमारे १० हजार लोकांची सोय कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून करण्यात येणार आहे. पाचऐवजी यावेळी फक्त तीनच स्टेज उभारण्यात येणार आहेत. पूर्वी प्रवेशासाठी एकच प्रवेशद्वार असायचे. मात्र, यावेळी १४ प्रवेशद्वारे तसेच बाहेर जाण्यासाठी ३० प्रवेशद्वारे ठेवण्यात येणार आहेत. प्रवेशद्वारांवर सुरक्षा व्यवस्था तसेच कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्ती केली जाईल. या ठिकाणी तोंडाला मास्क, हातात ग्लोज सक्तीचे असेल तसेच प्रत्येकाचे शरीर तापमान, थर्मल स्कॅनिंग तपासले जाणार आहे. बसण्यासाठीची व्यवस्था सुरक्षित अंतर ठेवून करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या सनबर्न महोत्साच्या प्रत्येक दिवशी तेथील परिसर निर्जंतुकीकरण (सॅनिटाईज) केला जाणार आहे.

  
या ठिकाणी असलेल्या खाद्यपदार्थांसाठी ‘फूड कोर्ट’ची सोय केली जाणार आहे व त्यावर नजर ठेवण्यासाठी टेहळणी मनोरे, आवश्‍यक प्रमाणात कचरापेट्या तसेच सफाई कामगारांचीही वर्णी लावण्यात येणार आहे. सरकारने परवान्यामध्ये ज्या अटी घालून दिल्या आहेत त्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. कोरोनामुळे सनबर्न महोत्सव गोव्यात होईल की नाही याबाबत अजूनही महोत्सवाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांच्या मनात शंका असली तरी हा महोत्सव झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
 

संबंधित बातम्या