हणजूण किनाऱ्यावरील ‘सनबर्न’ला अखेर ठोकले टाळे

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

बार्देशातील हणजूण समुद्र किनाऱ्याच्या तोंडावर शैलेश शेट्टी या परप्रांतियाकडून सीआरझेड कायद्याचा भंग करीत उभारण्यात आलेल्या सनबर्न नामक वादग्रस्त रेस्टॉरंटला बार्देशच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून अखेर टाळे ठोकण्यात आले.

शिवोली: बार्देशातील हणजूण समुद्र किनाऱ्याच्या तोंडावर शैलेश शेट्टी या परप्रांतियाकडून सीआरझेड कायद्याचा भंग करीत उभारण्यात आलेल्या सनबर्न नामक वादग्रस्त रेस्टॉरंटला बार्देशच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून अखेर टाळे ठोकण्यात आले. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापनाने दिलेल्या आदेशानुसार, ही कारवाई करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. 

दरम्यान, दरवर्षी या भागात होणारा सनबर्न महोत्सव कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा रद्द करण्यात आल्याने याच संधीचा फायदा घेत शैलेश शेट्टी नामक परप्रांतीय इसमाकडून येथील वोझरान किनाऱ्याच्या तोंडावर सीआरझेडचे उल्लंघन करून किनाऱ्याकडे जाणाऱ्या पारंपरिक वाटेवर अतिक्रमण करीत बेकायदा रेस्टॉरंट उभारण्यात आल्याची रितसर तक्रार कळंगुट पिपल्स फोरम तसेच स्थानिक एनजीओ कार्यकर्त्यांकडून गोवा सीआरझेड व्यवस्थापनाच्या पणजी येथील  कार्यालयात तक्रार करण्यात आली होती.

यावेळी कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दीवकर, शापोरा बोट असोसिएशनचे बलभीम मालवणकर, स्थानिक युवक रवी हरमलकर आदींनी या बेकायदा तसेच वादग्रस्त बांधकामाला हरकत घेत हणजूण किनारी निदर्शने केली होती. या संदर्भात गोवा सागरी क्षेत्र प्राधिकरण कार्यालयात तक्रार दाखल होताच याची गंभीर दखल घेत संबंधित व्यवस्थापनाने किनारी भागाची एका विशेष पथकाद्वारे १३ डिसेंबरला पाहणी करण्यात आली होती. दरम्यान, या पाहणीत रेस्टॉरंटचे बेकायदा बांधकाम हणजूण किनाऱ्यावरील पारंपरिक पायवाट अडवून करण्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. 
नियुक्त तपासणी पथकाचा अहवाल ग्राह्य धरून गोवा सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापनाकडून वादग्रस्त रेस्टॉरंटसंदर्भात आपला अंंतिम निर्णय देत संबंधित रेस्टॉरंटवर कारवाई आदेश बार्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली. 

या निर्णयाची कार्यवाही करताना बार्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वादग्रस्त रेस्टॉरंटला अखेर पोलिस बंदोबस्तात कायमचे टाळे ठोकण्यात आले. दरम्यान, सीआरझेड व्यवस्थापनाकडून संबंधित वादग्रस्त रेस्टॉरंटवर कारवाईचे आदेश दिल्याबद्दल कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दीवकर तसेच हणजूण-वागातोरचे एनजीओ कार्यकर्ते मायकल डिसोझा, बलभीम मालवणकर आणि रवी हरमलकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. आजच्या कारवाईमुळे बार्देशातील सागरी क्षेत्राचे उल्लंघन करणाऱ्यांना निश्चितच लगाम बसेल, असे कळंगुट पिपल्स फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दीवकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या