सौर ऊर्जा स्‍वयंपूर्णतेला बळकटी द्या

अवित बगळे
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

मुख्‍यमंत्री डॉ. सावंत : सौर ऊर्जा उत्‍पादकांना अनुदान वितरण

पणजी

येत्या पाच वर्षांत सर्व क्षेत्रात राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी आताच सुरवात करावी लागणार आहे. सरकारवर केवळ टीका करत बसण्यापेक्षा राज्याच्या विकासात आपण कसा हातभार लावू शकतो याचा विचार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे केले.
गोवा ऊर्जा विकास यंत्रणेच्या सौर ऊर्जा उत्पादकाना अनुदान वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वीजमंत्री नीलेश काब्राल, यंत्रणेचे सदस्य सचिव संजीव जोगळेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांनी छप्परावर सौर ऊर्जा निर्मिती सुरू केली त्यांचे अभिनंदन. हरित उर्जेच्या दिशेने राज्याला जायचे आहे. आमचे राज्य हे विजेसाठी अवलंबित असलेले राज्य आहे. सौर ऊर्जा निर्मिती आता गावागावात झाली पाहिजे. सरकारवर टीका करण्यासाठी अनेकजण पुढे येतात. वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था, चांगले रस्ते व पर्यावरण हवे असते. १० झाडे कापली तर १०० झाडे लावली जातात, हे कोणी पाहत नाही. आफ्रिका, इंग्लंड व रशियातून विरोध केला जातो हे समजत नाही. मोले येथे राहणाऱ्यांनी विरोध केला तर समजता येते. विजेचे सहा मनोरे अभयारण्यातून आणण्यात येतील. उद्योग २४ तास विनाखंड वीज द्यावी लागणार आहे. त्यासाठी २५- ३० टक्के वीज निर्मिती झाली पाहिजे. आर्थिक अडचणीत असताना सामाजिक जबाबदारी विसरलेले नाही. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा हे आमचे ध्येय आहे. आता सुरवात केली तर पुढील पाच वर्षांनी त्याची पूर्ती होईल.
काब्राल म्हणाले, अनुदानामुळे हरित ऊर्जा निर्मितीसाठी अनेकजण पुढे येतात. देशभरात अशी योजना अन्य कोणतेही सरकार राबवत नाही. हरित उर्जेची गरज या सरकारने ओळखली आहे. त्यामुळे तब्बल ५० टक्के अनुदान छप्परावर सौर पॅनेल बसवून सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांना दिली जाते. तसा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची सक्ती कायद्याने राज्यावर आहे. या क्षेत्रात राज्य मागे पडले होते मी वीजमंत्री झाल्यावर याकडे लक्ष पुरवले आणि सरकारी योजनेवर विश्वास ठेऊन छप्परांवर सौर ऊर्जा निर्मिती सयंत्रे बसवलेल्या अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

आणखी पाचशेजणांना अनुदान तरतूद : काब्राल
सध्‍या बसविण्‍यात येणारी सौर पॅनल २५ वर्षांनी बदलावी लागतील. त्यासाठी या क्षेत्रात गोमंतकीय व्यावसायिक आले पाहिजेत, असेही प्रयत्न आहेत असे वीजमंत्री नीलेश काब्राल म्‍हणाले. वीज जाते त्यावेळी सौर ऊर्जा निर्मिती सयंत्राला अपघात होऊ नये यावर उपाय शोधण्यात आला आहे. आणखीन पाचशे जणांना अनुदान देण्याची तरतूद सरकारने केली आहे.
वीज बिलांवर पूर्ण अनुदान देता येणार नाही पण सौर ऊर्जेवर अनुदान देता येते कारण ही हरित ऊर्जा आहे. राज्यात ऊर्जा निर्मितीत जनतेने आपला वाटा उचलला पाहिजे. केवळ सरकारवर टीका करून प्रश्न सुटणार नाही. सर्वांनी सौर ऊर्जा निर्मिती आपापल्या घरांच्या छप्परांवर केल्यास राज्याबाहेरून वीज आणण्यासाठी मोठ्या केबल्स घालाव्या लागणार नाहीत.
जोगळेकर म्‍हणाले, २०१७ मध्ये धोरण निश्चितीनंतर आता प्रत्यक्षात अनुदानाचे वाटप होत आहे. केंद्र सरकार पूर्वी ३० टक्के अनुदान देणार होते मात्र त्यानंतर त्यांनी ती योजना रद्द केल्याने आता पूर्ण पन्नास टक्के अनुदान गोवा सरकार देत आहे. लोकांनी आपल्या छप्परावर सौर पॅनल बसून हरित ऊर्जा निर्मितीत हातभार लावला त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. ५५ पैकी १० जणांना अनुदानाचे वाटप या कार्यक्रमात करण्यात आले. एकूण अनुदान ५५ लाख ८७ लाख ७८५ रुपयांचे होते.

संबंधित बातम्या