वास्कोत सुरमईची मासळी खवय्यांकडून लयलूट

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

वास्कोत सुरमईची रविवारी मासळी खवय्यांकडून लयलूट झाली. मोठ्या प्रमाणात सुरमईची आवक वाढल्याने वास्कोवासीय खरेदीसाठी गर्दी केली होती.

दाबोळी: वास्कोत सुरमईची रविवारी मासळी खवय्यांकडून लयलूट झाली. मोठ्या प्रमाणात सुरमईची आवक वाढल्याने वास्कोवासीय खरेदीसाठी गर्दी केली होती. एक महिन्यापूर्वी तांबसो या मासळीची आवक वाढली होती. त्यावेळी मासळी खवय्यांनी या मासळीचा भरपूर ताव मारला होता.

तशाच प्रकारे आजही देस्तेरोवाडा समुद्रकिनाऱ्यावर सुरमई मासा मोठ्या प्रमाणात सापडला, याची चाहूल वास्कोवासीयांना तसेच हॉटेल व्यावसायिकांना लागताच त्यांनी समुद्रकिनारी धाव घेऊन खरेदीसाठी झुंबड उडाली. ३५० रुपये किलो दराने सुरमई विक्री केली जात होती. दोन ते तीन किलोच्या वर असलेला हा मासा घेण्यास लोकांनी मागेपुढे पाहिले नाही. तसेच हॉटेल व्यवसायिकांनी पाच किलो दहा किलोचा फक्त एक मासा आपल्या हॉटेलसाठी नेला. तर काही लोकांनी भागीदारीत हा मासा घेऊन त्याचे वाटप केले.

दरम्यान अकस्मात वाढलेल्या या मासळीची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. तसेच सदर मासा कापण्यासाठी लोकांनी वास्कोतील मासळी मार्केटमध्ये धाव घेतली व एकच गर्दी केली. त्‍यामुळे मासळी कापणाऱ्यांची घालमेल झाली. मासे कापण्‍यासाठी गर्दी झाल्‍याचे लक्षात येताच मासे कापण्याचा दरही ऐनवेळी वाढवण्‍यात आला होता. तरीही मत्‍स्‍य खवय्‍ये सांगेल तो दर देऊन आपला मासा कापून घेत होते.

संबंधित बातम्या