लाचप्रकरणी सुरेंद्र गोवेकरला अटक 

dainik gomantak
सोमवार, 29 जून 2020

तक्रार मागे घेण्यासाठी हुनमंत गोवेकर याने २० लाखांची मागणी केली होती. व्यावसायिकाने ही रक्कम मोठी रक्कम असल्याने अखेर ९ लाखांवर समझोता झाला. ही रक्कम तीन हप्त्यात प्रत्येकी तीन लाखांप्रमाणे दिल्यानंतर तक्रार मागे घेण्याचे ठरले.
 

पणजी

लाचखोरप्रकरणी हणजूण - कायसूव पंचायत सदस्य हनुमंत गोवेकर याला काल लाच घेताना अटक केल्यानंतर फरारी झालेल्या पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर याला आज सकाळी त्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तिसऱ्या संशयित शीतल दाबोळकर हिच्या घराची पथकाने झडती घेण्यात आली मात्र ती अजूनही फरारी आहे. 
या विभागाचे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल व आज अटक करण्यात आलेले पंचायत सदस्य संशयित हनुमंत गोवेकर व सुरेंद्र गोवेकर याना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या पथकाने हनुमंत गोवेकर व शीतल दाबोळकर या दोघांच्या घरातून काही महत्त्वाचे दस्ताऐवज ताब्यात घेतले आहेत. या तिघांच्या बँक खात्याचीही माहिती पथकाने जमा केली असून ती गोठवण्यासाठी उद्या (२९ जून) बँकेशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी उद्या (२९ जून) ठेवली आहे. 
वागातोर - हणजूण येथील एका व्यावसायिक याचे वोझरान - वागातोर परिसरात हॉटेलचे बांधकाम होत आहे. हे बांधकाम बेकायदेशीर 
असल्याचा दावा करत हणजूण - कायसूव पंचायतीचे सदस्य हनुमंत गोवेकर, सुरेंद्र गोवेकर तसेच शीतल दाबोळकर या तिघांनी या व्यावसायिकाला त्याचा पर्दाफाश करण्याची धमकी दिली होती. यासंदर्भातची तक्रार गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (जीसीझेडएमए) दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी हुनमंत गोवेकर याने २० लाखांची मागणी केली होती. व्यावसायिकाने ही रक्कम मोठी रक्कम असल्याने अखेर ९ लाखांवर समझोता झाला. ही रक्कम तीन हप्त्यात प्रत्येकी तीन लाखांप्रमाणे दिल्यानंतर तक्रार मागे घेण्याचे ठरले. मात्र व्यावसायिकाने यासंदर्भातची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली. 
विभागाचे अधीक्षक शोबित सक्सेना यांनी या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तीन लाखांचा पहिला हप्ता देताना पंचायत सदस्यांना अटक करण्याचा सापळा रचला. व्यावसायिकाने या पंच सदस्यांना पहिला हप्ता घेऊन येत असल्याची माहिती दिल्यावर हनुमंत गोवेकर याने त्याला हणजूण येथील पेट्रोल पंपजवळ काल बोलावले. त्याने तीन लाख रुपपांपैकी एक लाख रुपये घेऊन हनुमंत गोवेकर याला भेटून रक्कम देत असताना हुनमंत सापळ्यात अडकला. हनुमंत गोवेकर याला ताब्यात घेतल्याची चाहूल लागताच सुरेंद्र गोवेकर व शीतल दाबोळकर हे तेथेच जवळपास होते ते पसार झाले. काल रात्री सुरेंद्र गोवेकर घरी परतला असता त्याच्या घरावर पाळत ठेवलेल्या पथकातील साध्या वेशातील पोलिसानी त्याला अटक केली. संशयित शीतल दाबोळकर हिच्या घरासह तिच्या नातेवाईकांची माहिती घेऊन पोलिसांनी शोध मोहीम सुरू ठेवली आहे. 
पंचायत सदस्य असलेला सुरेंद्र गोवेकर हा स्वतःला आरटीआच कार्यकर्ते म्हणून हणजूण भागात नावाजलेला होता. मात्र त्याला आज अटक झाल्याने हणजूण परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे. हणजूण परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे केली जातात 
त्यामुळे अशा बांधकाम व्यावसायिकांची सतावणूक करून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करण्याचे प्रकार सुरू आहेत. 
 

 

संबंधित बातम्या