फिरत्या विक्रेत्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

म्हापसा पालिका क्षेत्रातील तसेच विशेषत: बाजारपेठेतील फिरत्या विक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय अलीकडेच झालेल्या टाऊन वेंडिग कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.

म्हापसा : म्हापसा पालिका क्षेत्रातील तसेच विशेषत: बाजारपेठेतील फिरत्या विक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय अलीकडेच झालेल्या टाऊन वेंडिग कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीसाठी समितीचे सदस्य तसेच वाहतूक पोलिसांचे प्रतिनिधी व काही विक्रेत्यांची उपस्थिती होती, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. बाजारपेठेत कोणते विक्रेते प्रत्यक्षपणे व्यवसाय करतात याबाबत पडताळणी करण्याचा हा उद्देश आहे, असेही श्री. शिरगावकर म्हणाले. या सर्वेक्षणानंतर अहवाल तयार करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. तथापि, या बैठकीच्या आयोजनाच्या संदर्भात आश्चर्याची बाब म्हणजे म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांना या बैठकीचे निमंत्रण नव्हते.

दरम्यान, टाऊन वेंडिग कमिटीच्या बैठकीचे निमित्त पुढे करून म्हापसा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वत:च्या कार्यालयात होणार असलेल्या सुनावण्या प्रलंबित केल्याचे आढळून आले. प्रलंबित केलेल्या या सुनावण्या आता ६ नोव्हेबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहेत.

म्हापसा नगरपालिका क्षेत्रातील निगडित नागरिकांच्या ज्या थेट मुख्याधिकाऱ्यांशी मांडण्यासाठीच्या समस्या व विधायक स्वरूपाच्या सूचना असतील तर त्या थेट म्हापसा नगरपालिका मुख्याधिका कबीर शिरगावकर यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवाव्यात, अशा आशयाचे निवेदन पालिकेच्या प्रवेशद्वारावर तसेच मुख्याधिकारी कार्यालयाच्या दरवाजावर चिकटवण्यात आले आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या समस्या व सूचना मांडण्यासाठी थेट मुख्याधिकारी शिरगावकर यांच्या ९६०७०३६१२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन म्हापसा पीपल्स युनियनने केले आहे. नागरिकांनी पालिकेच्या कामकाजाबाबत दक्ष राहावे, असे आवाहनही या संस्थेने केले आहे.

संबंधित बातम्या