सुशांतच्‍या मृत्यूप्रकरणी गौरव आर्याच्या शोधात ‘एनसीबी’चे पथक गोव्यात

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

काही दिवसांपूर्वीच गोवा क्राईम ब्रँचने हणजूण रेव्ह पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याला अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणाशी गौरव आर्या याचे लागेबांधे असण्याची शक्यशक्यता पडताळणी हे पथक करत आहे.

पणजी: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी संबंधित धागेदोरे आता गोव्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातील संशयित रिया चक्रवर्ती हिच्याशी ड्रग्जसंदर्भात गोव्यातील हॉटेल चालक गौरव आर्या याच्याशी संवाद झाल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) पथक आज गोव्यात आले आहेत. या पथकाने गौरव आर्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नव्हता. 

काही दिवसांपूर्वीच गोवा क्राईम ब्रँचने हणजूण रेव्ह पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याला अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणाशी गौरव आर्या याचे लागेबांधे असण्याची शक्यशक्यता पडताळणी हे पथक करत आहे. या रेव्ह पार्टीसाठी त्याने ड्रग्ज पुरवठा केला होता का? याचीही चौकशी या पथकाने सुरू केली आहे. 

गोव्यात आलेले हे पथक थेट हणजूण येथील गौरव आर्या याच्या हॉटेल या ठिकाणी छापा टाकतील, असे गृहित धरून प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी ठाण मांडले होते. मात्र, हे पथक त्या ठिकाणी पोहचलेच नाही, तर हणजूण भागात या प्रकरणाची गुप्तपणे चौकशी सुरू केली आहे. गौरव आर्या हा कालपर्यंत अक्षित शेट्टी याच्यासोबत गोव्यात होता. मात्र त्याची चौकशी होऊ शकते यामुळे तो गायब झाला आहे. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व या चौकशीसाठी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या सुमारे २० जणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये हणजूण येथील हॉटेल चालक गौरव आर्या याचेही नाव आहे. हणजूण रेव्ह पार्टीसाठी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यामध्ये गौरव आर्या याचा हात असल्याची शक्यता या पथकाने वर्तविली आहे. त्यामुळे ही रेव्ह पार्टी आयोजित केलेल्या कपिल झवेरी याचीही या पथकाकडून चौकशी होऊ शकते. 

सुशांतसिंह राजपूत याच्या गूढ मृत्यूप्रकरणी संशयित रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉटस्ॲपवरील मेसेजीस तिने काढून टाकल्या होते. मात्र तपास यंत्रणेने या मेसेजीस शोधून काढल्याने तिने ड्रग्ज पुरवठादारांशी ड्रग्ज खरेदी करण्यासाठी केलेल्या चॅट मेसेजीसमधून अनेक बाबी समोर आल्या आहेत. तिने हा ड्रग्ज खरेदीसाठी ज्या ड्रग्ज पुरवठादारांशी संपर्क साधला त्यामध्ये गौरव आर्या याचेही नाव समोर आले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या