गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकांना निलंबित करा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

 दिवसेंदिवस वादातीत बनणाऱ्या "गोवा डेअरी"च्या कार्यकारी व्यवस्थापकीय संचालकांकडून दूध उत्पादक शेतकऱ्याला  शिवीगाळ करण्याचा प्रकार निंदनीय असून, प्रशासकीय समितीने या प्रकाराची गंभीरतेने दखल घ्यावी. याप्रकरणी  कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांना तातडीने निलंबित करुन या प्रकाराची निःपक्षपातीपणे सखोल चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांतर्फे संजीव कुंकळकर आणि आमठाणे दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष वैभव परब यांनी पत्रकार परिषदेत केली. 

डिचोली :  दिवसेंदिवस वादातीत बनणाऱ्या "गोवा डेअरी"च्या कार्यकारी व्यवस्थापकीय संचालकांकडून दूध उत्पादक शेतकऱ्याला  शिवीगाळ करण्याचा प्रकार निंदनीय असून, प्रशासकीय समितीने या प्रकाराची गंभीरतेने दखल घ्यावी. याप्रकरणी  कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांना तातडीने निलंबित करुन या प्रकाराची निःपक्षपातीपणे सखोल चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांतर्फे संजीव कुंकळकर आणि आमठाणे दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष वैभव परब यांनी रविवारी (ता.1) डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

कार्यकारी व्यवस्थापकीय संचालकां विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ झाल्यास शेतकरी आक्रमक पवित्रा घेण्यास मागे राहणार नाहीत. असा इशाराही संजीव कुंकळकर आणि वैभव परब यांनी दिला आहे. गोवा डेअरीवर सध्या सरकार नियुक्‍त प्रशासकीय समितीचा ताबा असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच सहकार निबंधकांनी याप्रकरणी लक्ष घालून आवश्‍यक ती कारवाई करावी. अशी मागणीही संजीव कुंकळकर आणि वैभव परब यांनी केली आहे. कार्यकारी व्यवस्थापकीय संचालकांच्या या कृत्याबद्‌दल सहकार निबंधक तसेच प्रशासकीय समितीला कळविण्यात आले आहे. असेही यावेळी स्पष्ट करण्यात आहे. सहकार क्षेत्रातील "गोवा डेअरी" ही राज्यातील एक मोठी संस्था आहे. कर्मचारी, दूध उत्पादक, ग्राहक आदी मिळून हजारो कुटुंबे या संस्थेवर अवलंबून आहेत. आधीच विविध कारणांमुळे गोवा डेअरी दिवसेंदिवस बदनाम होत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्यात आता वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या पदाची सभ्यता ओलांडून दूध उत्पादक शेतकऱ्याला घाणेरड्या शिव्या घालणे, हा प्रकार निंदनीय असल्याचे संजीव कुंकळकर यांनी म्हटले आहे. 

गोवा डेअरीच्या दूध विक्रीत घट झाली असून, कोणतेही नियोजन न करता शिल्लक दूध बटर आणि पावडर करण्यासाठी फलटण-सातारा येथील गोविंद डेअरीला पुरवण्यात येत आहे. या व्यवहारामुळे गोवा डेअरीला लाखोंचे नुकसान होत असल्याचा दावा साळ-डिचोली येथील दूध उत्पादक तथा भूमिका सहकारी दूध उत्पादक संस्थेचे आदिनाथ परब यांनी अलीकडेच केला आहे. आदिनाथ परब यांचा हा दावा खरा की खोटा याबाबत कार्यकारी व्यवस्थापकीय संचालकांकडून स्पष्टीकरण अपेक्षित होते. मात्र, स्पष्टीकरण सोडाच, उलट अत्यंत खालच्या पातळीवर जावून कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक श्री. फडते यांनी आदिनाथ परब यांना शिवीगाळ करणे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असा आहे, असे मत संजीव कुंकळकर यांनी व्यक्‍त केले.
आदिनाथ परब यांनी मागील शुक्रवारी कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांच्या विरोधात डिचोली पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीला अनुसरुन पोलिसांनी उद्या सोमवारी अनिल फडते यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याची माहिती मिळाली 
आहे.

संबंधित बातम्या