स्वप्नील वाळके खूनप्रकरणातील संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

मडगावातील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांच्या खूनप्रकरणातील संशयित मुस्तफा शेख, ओमकार पाटील व एव्हेंडर रॉड्रिग्ज या तिघांची आज मडगाव न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

पणजी: मडगावातील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांच्या खूनप्रकरणातील संशयित मुस्तफा शेख, ओमकार पाटील व एव्हेंडर रॉड्रिग्ज या तिघांची आज मडगाव न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या तिघांविरुद्ध पणजी, हणजूण तसेच आगशी पोलिस स्थानकात चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पणजी पोलिसांनी त्याना ताब्यात घेण्यासाठी अर्ज केला आहे. 

दरम्यान, वाळके यांचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल बिहार येथून खरेदी करण्यात आले होते त्यामुळे सीआयडी क्राईम ब्रँचचे पथक येत्या काही दिवसांत बिहारला जाणार आहे. सखोल चौकशीअंती वाळके यांना धाक दाखवून त्यांचे दुकान लुटण्याचा या संशयितांचा उद्देश होता मात्र त्यांनी संशयित मुस्तफा शेख याला विरोध केल्याने त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. जखमी अवस्थेतही त्यांनी त्याला पकडून ठेवल्याने संशयिताने त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यामुळे ही घटना जबरी चोरीतून घडल्याचा निष्कर्षाप्रत तपास पोहचला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी दिली. 

मडगावातील वाळके यांचा खून घडण्यापूर्वी दोनापावल येथील जेटीवरून गाडी चोरल्याप्रकरणी पोलिस स्थानकात अनोळखी संशयित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मात्र या खुनाच्या तपासातून ही गाडी एव्हेंडर रॉड्रिग्ज याने चोरल्याचे उघड झाल्याने त्याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गाडी वाळके यांच्या ज्वेलरी दुकानासमोर पळून जाण्यासाठी आणून ठेवण्यात आली होती.   हणजूण येथील पोलिस स्थानकात एव्हेंडर रॉड्रिग्ज व ओमकार पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच आगशी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखला आहे. त्यामुळे या तिघा संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली असली तरी या विविध पोलिस स्थानकातील गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे. 

ओमकार पाटीलचा जामिनासाठी अर्ज
सराफी व्यावसायिक स्वप्निल वाळके यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेला संशयित ओमकार पाटील याने दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने या अर्जावर निवेदन सादर करण्यास मुदत मागितली असून या अर्जावर २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या