जबरी चोरीच्या उद्देशानेच स्वप्नील वाळकेंचा खून;  मुस्तफा शेखची कबुली

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

अट्टल गुन्हेगार असलेल्या मुस्तफा शेख याने हा गुन्हा करण्यापूर्वी मडगावातील सराफी दुकानांची रेकी केली होती व त्यानंतर वाळके यांचे सराफी दुकान त्याने लक्ष्य केले होते, अशी माहिती क्राईम ब्रँचच्या तपासात पुढे आली आहे.  

पणजी: मडगाव शहरात भरदिवसा सराफी स्वप्नील वाळके याच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार मुस्तफा शेख याने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड होत आहे. तरीही सीआयडी क्राईम बँचने या खुनाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे. अट्टल गुन्हेगार असलेल्या मुस्तफा शेख याने हा गुन्हा करण्यापूर्वी मडगावातील सराफी दुकानांची रेकी केली होती व त्यानंतर वाळके यांचे सराफी दुकान त्याने लक्ष्य केले होते, अशी माहिती क्राईम ब्रँचच्या तपासात पुढे आली आहे.  

या खूनप्रकरणी आतापर्यंत संशयित मुस्तफा शेख, ओमकार पाटील व एव्हेंडर रॉड्रिग्ज याला अटक झाली आहे. आज एव्हेंडर याला मडगाव न्यायालयाने नऊ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. यापूर्वी ओमकार व मुस्तफा या दोघाना दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. 

...म्‍हणून ठरवली दुपारची वेळ!
संशयित मुस्तफा शेख व त्याचे साथीदार हे भुरट्या चोऱ्यांमध्ये गुंतलेले आहेत. सराफी दुकानात चोरी करण्याचा कट शेख मुस्तफाने आखला व त्यासाठी त्याने ओमकार व एव्हेंडर या दोघांना त्याच्या पूर्वनियोजित कटाबाबत माहिती दिली. या चोरीसाठी त्यांनी मडगाव येथील शहर निवडले. त्याला मडगावमधील सर्व कानाकोपरा माहीत असल्याने चोरीनंतर सहज पळून जाण्यास मदत होईल, हा उद्देश त्यामागील होता. त्यानंतर मडगावातील मोठी सराफी दुकानांचा सर्वे त्याने सुरू केला. दुकानात एकटाच मालक असलेली सराफी दुकाने असलेली यादी त्यांनी तयार केली व कोणत्यावेळी ग्राहकांची वर्दळ कमी असते याची माहिती मिळवण्यास सुरू केली. कोविड काळात दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उपस्थिती सराफी दुकानात कमी असल्याने त्या संधीचा फायदा घेण्याचा बेत आखला. मुस्तफा शेख याने वाळके याचे सराफी दुकान लक्ष्य ठरविण्यात आले. दुपारच्या वेळेस या भागात वर्दळ कमी असल्याने त्याने दुपारची वेळ ठरविली.

...तर एडसनवरही होऊ शकते कारवाई?
वाळके यांच्या कृष्‍णी या सराफी दुकानातील सोन्याचे दागिन्यांची लूट करण्यासाठी मुस्तफा शेख व ओमकार हे चोरलेल्या गाडीने आले होते, तर एव्हेंडर हा दुचाकीने आला होता. पोलिसांनी या घटनेनंतर ताब्यात घेतलेल्या एडसन फर्नांडिस हा त्यांचा साथीदार असला तरी घटनेच्या दिवशी तो त्यांच्यासोबत नव्हता. त्यामुळे त्‍याला अटक न करताच सोडून देण्यात आले होते. तपासात त्याच्याविरुद्ध काही ठोस पुरावे समोर आल्यास कारवाई होऊ शकते.

‘सीडीआर’नुसार तपास
दरम्यान, क्राईम ब्रँचने वाळके यांच्या भ्रमणध्वनीमधील ‘सीडीआर’ (कॉल्स डिटेल्स रिपोर्ट) माहिती मिळवून मागील गूढ शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या ‘सीडीआर’मधील काही मोबाईल क्रमांकची माहिती संग्रहित करण्यासाठी क्राईम ब्रँचचे पथक परिश्रम घेत आहे. 

स्वप्नीलच्या धाडसाने मुस्तफाचा डाव फसला!
मडगाव येथील कृष्‍णी ज्वेलर्स या दुकानात लूट करण्यासाठी मुस्तफा शेख हा एकटाच गेला होता, तर त्याचे दोन्ही साथीदार ओमकार व एव्हेंडर हे दुकानाबाहेर होते. दुकानात कोणीही नसल्याने मुस्तफा याने पिस्तूल काढून स्वप्नील वाळके याच्यावर रोखले. मात्र, स्‍वप्‍नील वाळके यांनी धाडस करून त्याला विरोध केला असता झटापत झाली व मुस्तफाने स्‍वप्‍नील यांच्‍यावर गोळी झाडली. गोळी लागली तरी स्‍वप्‍नीलने मुस्तफाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर त्‍याने सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्यामध्ये दुकानात पुन्‍हा झटापट सुरू झाली. दुकानातील गोळीच्या आवाजाने दुकानाबाहेर मुस्तफा याची वाट पाहत थांबलेला ओमकार पाटील याने तेथून धूम ठोकली. रक्ताने माखलेल्या स्थितीत स्वप्नीलने मुस्तफाचा हात पकडला. स्वप्नीलने त्याचे टीशर्ट पकडले असता मुस्तफाने दुकानातून पळण्यासाठी स्‍वप्‍नीलला खेचत बाहेर आणले आणि पँटमध्ये लपवून ठेवलेल्या सुऱ्याने त्याच्यावर वार करून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचवेळी हेल्मेट घालून उभा असलेला एव्हेंडर याने मुस्तफा याची सुटका होण्यास मदत केली. मुस्तफा त्यानंतर पळत सुटला, तर त्याच्यामागोमाग एव्हेंडरही पळाला. दुकानातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तर बाहेरील घटना एका व्यक्तीने काढलेल्या मोबाईलमध्ये कैद झाली आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या