स्वप्नील वाळके खून प्रकरण: एडिसन गोन्साल्विसच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

संशयित एडिसन गोन्साल्विस याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सध्या सशस्त्र जबरी चोरीच्या उद्देशाने खून केल्याची दिशा पकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

पणजी: मडगावातील सराफी दुकानात भरदिवसा स्वप्नील वाळके याच्या खूनप्रकरणातील तिघाही संशयितांची पोलिस कोठडी आज संपल्याने ती वाढवून घेण्यासाठी उद्या (१४ सप्टेंबर) मडगाव न्यायालयात उभे केले जाणार आहे. संशयित एडिसन गोन्साल्विस याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सध्या सशस्त्र जबरी चोरीच्या उद्देशाने खून केल्याची दिशा पकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेऊन व त्याला त्यानंतर सोडून दिल्यानंतर एडिसने केलेल्या अटकपूर्व जामिनामुळे तर्क - वितर्क काढले आहेत.  

गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने संशयित मुस्तफा शेख याने स्वप्नील वाळके याच्यावर गोळी झाडलेले पिस्तुल, चाकू तसेच संशयितांनी घटनेच्या दिवशी वापरलेले कपडे, बोलेरो, दोन दुचाकी जप्त केली आहेत. आतापर्यंत १८ जणांच्या जबान्या नोंदविण्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी दुकानाबाहेर घटना पाहणाऱ्यां काही व्यक्तींचा समावेश आहे. ज्याने ही घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे त्याचा मोबाईल तसेच त्याचीही जबानी घेण्यात आली आहे. ‘भादंसं’खाली खून, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे तसेच शस्त्रास्त्र कायद्याखाली संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

जबरी चोरीमागे मास्टरमाईंड एव्हेंडर रॉड्रिग्ज असून त्याने चोरीचा नियोजित कट आखला होता व चोरी करण्यासाठी संशयित मुस्तफा शेख याच्यावर जबाबदारी सोपविली होती. गुन्हेगारीची पार्श्‍वभूमी असलेला संशयित मुस्तफा याने पैशांसाठी एव्हेंडर याने दिलेली सुपारी घेतली होती, असे चौकशीत आढळून आले आहे अशी माहिती सूत्राने दिली. 

दरम्यान, स्वप्नील वाळके याच्या खुनानंतर राज्यात वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात येत होते. या प्रकरणातील संशयित एव्हेंडर गोन्साल्विस याने हणजूण येथील आपल्याच आतेचे दागिने बँकेत सुरक्षित न ठेवता ते चोरून फसवणूक केली होती. 

त्यामुळे वेगळा तर्क काढण्यात येत होता. मात्र त्यासंदर्भात संशयितांची केलेल्या चौकशीत पुढे काहीच आले नसल्याने तपासाची दिशा जबरी चोरी हीच ठेवण्यात आली. 

पोलिस तपासबाबत वाळके कुटुंबियांनी किंवा कोणीही हरकत घेतलेली नाही. 

जर कोणाला अधिक काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, त्याचीही पडताळणी केली जाईल असे आवाहन करण्यात आले होते. 

संशयितांविरुद्ध पणजी पोलिसांत बोलेरो चोरीप्रकरणाची तक्रार दाखल आहे. त्यामुळे या तिघा संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्यास पणजी पोलिस त्यांना ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाला अर्ज करणार आहेत. याव्यतिरिक्त हणजूण पोलिस स्थानकात एव्हेंडर गोन्साल्विस याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार आहे त्यामध्ये तो त्या प्रकरणात पोलिसांना हवा आहे. त्यामुळे त्याला या प्रकरणातही अटक होऊ शकते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या