एडसन गोन्साल्विसची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव; तिघांच्या पोलिस कोठडीतील वाढ
Swapnil Walke murder case: Edson Gonsalves applies for anticipatory bail

एडसन गोन्साल्विसची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव; तिघांच्या पोलिस कोठडीतील वाढ

पणजी: मडगावातील सराफी दुकानात भरदिवसा स्वप्नील वाळके याच्या खूनप्रकरणातील तिघाही संशयितांनी घटनेच्या दिवशी संपर्कात असलेली माहिती त्यांच्या मोबाईलवरून जमा करण्यात येत आहे. तिघांची पोलिस कोठडी वाढून घेण्यास त्याना सोमवारी (१४ सप्टेंबर) न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेऊन एडसन गोन्साल्विस याला सोडून दिले होते तरी त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणीही सोमवारीच ठेवण्यात आली आहे. 

जबरी चोरीसाठी खून केलेल्या संशयित मुस्तफा शेख, ओमकार पाटील व एव्हेंडर रॉड्रिग्ज या तिघांच्या कटकारस्थानाची तसेच इतर पुरावे त्यांच्या जबान्यांमधून एकत्रित करण्यात येत आहेत. तपासकाम अजूनही सुरू असल्याने पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयात केली जाणार आहे. जबरी चोरीसाठी खून केल्याचे आतापर्यंतच्या तपासकामात निष्कर्ष समोर आला असला तरी अजूनही तपासकामाच्या इतर दिशा (अँगल्स) खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जमा करण्यात आलेल्या पुराव्यांसह घटनाक्रमाची साखळी तयार करण्याचे काम सुरू आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या खूनप्रकरणी वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात येत होते. मात्र काल पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा उद्देश व हेतू याची माहिती दिली. तपास यंत्रणा विविध अंगांनी काम करत असल्याने सर्व बाजू तपासून पाहिल्या जात आहेत. पोलिस तपासबाबत वाळके कुटुंबियांनी किंवा कोणीही हरकत घेतलेली नाही. जर कोणाला अधिक काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, त्याचीही पडताळणी केली जाईल असे त्यानी स्पष्ट केले होते.  यासंदर्भात कोणाला वेगळी माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, नाव गुप्त ठेवले जाईल असे क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याने सांगितले.

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com