स्‍वप्‍नील वाळके खून प्रकरण: नियोजन फिसकटल्‍याने चोरी फसली

स्‍वप्‍नील वाळके खून प्रकरण: नियोजन फिसकटल्‍याने चोरी फसली
Swapnil Walke murder case: Robbery gone wrong due to planning fiasco

सासष्टी: वाळके यांच्या दुकानात त्यांनी सोने विकले होते का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता तपासात आतापर्यंत असे काही निष्पन्न झाले नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जात आहेत. पण, त्यात तथ्य नाही. हे प्रकरण निव्वळ सशस्त्र जबरी चोरीचे आहे. संशयितांचे नियोजन फिसकटल्याने चोरी अपयशी ठरली, असे मीणा यांनी स्पष्ट केले. 

या प्रकरणी सांगण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या कहाण्या मी फेटाळून लावत आहे. गुन्हे शाखेचे तज्ज्ञ व अनुभवी अधिकारी या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. स्वप्नील व संशयितांमध्‍ये काहीही संबंध नव्हता. संशयितांनी त्यांना सोने विकण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. स्वप्नील यांना या प्रकरणी विनाकारण दोष दिला जात आहे. हा केवळ जबरी चोरीचाच प्रकार होता, असे मीणा यांनी सांगितले. 

बोलेरो जीपही चोरीची
संशयितांनी चोरीसाठी वापरलेले पिस्तूल व चारचाकी जप्त केली आहे. संशयितांनी पिस्तूल बिहारमधून आणले होते, तर चारचाकी दोनापावल येथून चोरी केली होती. चारचाकी चोरल्याप्रकरणी पणजी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंद करण्यात आली आहे. दोनापावल येथील कीगन रॉड्रिग्ज हे इंग्लंडमध्ये असतात. त्यांच्या बंगल्यात एका रात्री प्रवेश करून या संशयितांनी चोरी केली होती. तिथे त्यांना बोलेरो वाहनाची चावी सापडली, अशी माहिती मीणा यांनी दिली. 

संशयित एव्हेंडर रॉड्रिगीस याने यापूर्वी आपल्या नातेवाईकांचा घरातील सोने बॅंकेत ठेवण्याच्या बहाण्याने ओमकार पाटील याच्या मदतीने हडपले होते. याप्रकरणी हणजुणे पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाल्यावर पाटील याला अटक केली होती. तर एव्हेंडर फरार झाला होता. आता एव्हेंडरला अटक करण्यात आल्यामुळे त्या प्रकरणाचा तपासकामाला वेग मिळाला आहे. त्याने सोने कुठे ठेवले व विकले याचा तपास सुरू आहे, असे मीणा यांनी सांगितले. 

एडसन गोन्साल्‍विस याला अटक करण्यात आली नाही. त्याला ताब्यात घेण्यात आले होते. तो या संशयितांचा मित्र आहे. पण, या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे दिसून आलेले नाही. त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, तर त्याला आम्ही अटक केली असती, असे मीणा यांनी सांगितले. एडसन याची एक ध्वनिमुद्रीत क्लीप प्रसिद्धी माध्यमात प्रसारित करण्यात आली होती असे पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणले असता आम्ही सर्व धागेदोरे पडताळून पाहात आहोत असे स्पष्ट केले.  

सुरक्षेसाठी बूथ व सीसी टीव्ही कॅमेरा
मडगावमध्ये कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांचा भरदिवसा झालेल्या खुनामुळे मडगावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून मडगावमधील नागरीक तसेच व्यापाऱ्यांना सुरक्षा पुरविण्यासंबंधी उपाययोजना करण्यासाठी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, मडगाव पालिका, सराफी संघटना आणि मार्केट संघटनेसोबत बैठक घेण्यात आलेली आहे. अशा घटनांची मडगावात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मडगाव पालिका सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असून सुरक्षेसाठी बूथ स्थापन करण्यात आलेले आहे. या बूथमध्ये पोलिस तैनात करण्यात येणार असून मडगावात पोलिसांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती गोव्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी दिली. 

महत्त्‍वपूर्ण केस म्हणून गुन्हे शाखेकडे तपास सोपवला
हे खून प्रकरण अतिमहत्त्‍वाचे होते. या प्रकरणामुळे मडगाव शहर हादरून गेले होते. जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा, असे सर्वांनाच वाटत होते. स्थानिक पोलिसांकडे या प्रकरणाच्या तपासासाठी तेवढा वेळ नव्हत. अशा प्रकरणांचा तपास करण्याचे कौशल्य गुन्हे शाखेकडे असते. या प्रकरणातील तिसऱ्या संशयितास अटक करण्याची गरज होती. प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करणे आवश्यक होते. स्थानिक पोलिस स्थानकाचे निरीक्षक व उपअधीक्षकांना इतर कामेही असतात. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. हा आपला निर्णय असून या निर्णयावर मला कोणी प्रश्न करू शकत नाही. खरेतर गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवण्याच्या निर्णयाचे स्वागत झाले पाहिज, असे मत मीणा यांनी व्यक्त केले. 

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com