स्‍वप्‍नील वाळके खून प्रकरण: संशयित एव्हेंडरही पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी
रविवार, 6 सप्टेंबर 2020

खुनाचा महिनाभरापूर्वीच कट, केपेत गोळीबाराचा सराव

पणजी: मडगाव येथील सराफ स्वप्निल वाळके खून प्रकरणातील चौथा संशयित एव्हेंडर रॉड्रिग्ज याला आज पकडण्यात आले. यानंतर वाळके यांचे दुकान लुटणे आणि त्यांचा खून करण्याचा कट महिनाभरापूर्वीच करण्यात आला होता, अशी महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती आली. गोळी झाडण्यापूर्वी मुख्य संशयित मुस्तफा शेख याने केपे परिसरातील जंगलात गोळीबाराचा सराव केला होता, हेही पोलिस तपासात उघड झाले. पोलिसांनी मुस्तफाला तेथे नेत या गोष्टीची खातरजमा केली.  याप्रकरणी पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील तपास करीत आहेत.

या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांना रॉड्रिग्ज सांताक्रुझ परिसरातच दडून बसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यांनीच याआधी दोघा संशयितांना पकडले होते. रॉड्रिग्ज एका बांधकाम अर्धवट असलेल्या इमारतीत दडून बसलेला होता. त्याला पोलिसांनी घेरले आणि शरण येण्यास भाग पाडले.

दरम्यान, मडगाव प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल वाळके खून प्रकरणातील मुख्य संशयित मुस्तफा शेख याने नेसाय व केपे येथील जंगलात पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा सराव केला होता, अशी माहिती उघड झाली असून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना संशयितांनी शुक्रवारी रात्री या जागा दाखवल्या.

वाळके यांचा खून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून केला असावा, असा पोलिसांची कयास असून त्यादिशेने एडसन गोन्सालवीस या संशयिताकडून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यादिशेने समांतर पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे. ४५ हजार रुपये मोजून देशी कट्टा (पिस्तुल) घेतल्याचे मुस्तफाने पोलिसांनी सांगितले. परंतु मुख्य संशयित मुस्तफा शेख याबाबत वेगवेगळी माहिती देत दिली आहे. एकदा हा देशी कट्टा बिहारमधून आणल्याचे तर एकदा पणजी येथून एका बिहारीकडून खरेदी केल्याचे तो सांगत आहे. 

काही महिन्यांपूर्वी संशयित मडगावात हॉटेलात उतरले होते व त्यांच्या जवळ असणारे सोने विकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, अशी माहितीही उघड झाली आहे. बोलेरो जीपमधून सकाळीच संशयित घटनास्थळाजवळ आले होते. हा भाग गजबजलेला असल्याने पलायन करताना सोपे व्हावे म्हणून मुस्तफा याने या ठिकाणी एक दुचाकीही आणून ठेवली होती. 

या प्रकरणात गुन्हे शाखाने एडसन गोन्साल्वीस व ओंकार पाटील या संशयितांना ताब्यात घेऊन मडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तर या प्रकरणातील मुख्य संशयित मुस्तफा शेख मडगाव पोलिसांना शरण आला. अटकेतील मुस्तफा व ओंकार पाटील यांना १० दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर एडसन याला पोलिसांनी अटक केलेली नाही.

संबंधित बातम्या