स्‍वप्‍नील वाळके खून प्रकरण: संशयितांकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

मडगावात भरदिवसा सराफी स्वप्नील वाळके याच्यावरील हल्ल्यानंतर मुख्य सूत्रधार मुस्तफा शेख व त्याचा साथीदार एव्हेंडर रॉड्रिग्ज या दोघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी स्वतःच्या अंगावरील कपडे दोनापावल येथील पठारावर जाळले होते.

पणजी: मडगावात भरदिवसा सराफी स्वप्नील वाळके याच्यावरील हल्ल्यानंतर मुख्य सूत्रधार मुस्तफा शेख व त्याचा साथीदार एव्हेंडर रॉड्रिग्ज या दोघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी स्वतःच्या अंगावरील कपडे दोनापावल येथील पठारावर जाळले होते. त्या ठिकाणी त्यांना नेऊन पंचनामा करण्यात आला. सध्या अटकेत असलेल्या तिघाही संशयितांची वैद्यकीय तपासणी करताना कोविड चाचणीही करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

संशयितांनी अंगावरील कपडे दोनापावल येथे जाळून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१ नोंदविण्यात आले आहे. यापूर्वीच खून व जबरी चोरी तसेच कटकारस्थानचा गुन्हा नोंद करण्यात आले होते. आतापर्यंत मडगाव परिसरातील काही सराफी दुकानदारांशी पोलिस संपर्क करून सर्व बाजूने चौकशी करत आहेत. 
 
दुचाकीसह हेल्‍मेटही जप्‍त
आतापर्यंत क्राईम ब्रँच पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली चोरीची गाडी जप्त केल्यानंतर आज दुचाकी ताब्यात घेतली आहे. ही दुचाकी त्या सराफी दुकानाच्या जवळच घटनेनंतर पडून आहे. त्यामुळे ती ताब्यात घेण्यात आली आहे तसेच एक हेल्मेटही जप्त केले आहे. सध्या कोविड संसर्ग असल्याने पोलिसांनी संशयितांची तपासणी करताना त्यांची कोविड चाचणीही केली. त्यामध्ये मुस्तफा शेख व ओमकार पाटील यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे तर एव्हेंडर रॉड्रिग्ज याची आज संध्याकाळी कोविड चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अजून यायचा बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वाळके यांच्या कुटुंबियांशीही संपर्क करण्याचा प्रयत्न करून त्यांचा कोणावर संशय आहे का याची माहिती मिळवण्यात येत आहे. दुपारच्यावेळी वाळके हे आपल्या सराफी दुकानात एकटेच असतात त्यामुळे चोरी करण्यास सोपे होईल या उद्देशाने त्यांचे दुकान संशयित मुस्तफा शेख याने लक्ष्य ठरविले होते.  

अनुभवी निरीक्षकाची वर्णी शक्य!  
यावर्षीच बढती मिळालेल्या निरीक्षक सचिन नार्वेकर यांना मडगाव पोलिस स्थानकात नियुक्त केले होते. यापूर्वी या स्थानकात अनुभवी निरीक्षकांनी काम केले आहे. वाळके खूनप्रकरणी संशयितांना गजाआड करण्यात क्राईम ब्रँचने मोठी कामगिरी बजावली. मात्र, मडगाव पोलिस स्थानकाकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे महासंचालकांनी नाराजी व्यक्त करून प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपविले. 

मुस्‍तफाला आपला दरारा निर्माण करावयाचा होता
संशयित मुस्तफा याला इतर गुंडांप्रमाणे स्वतःची दहशत निर्माण करण्याबरोबरच मोठ्या चोऱ्या करण्याचे विचार घोळू लागले होते. एक वर्षापूर्वी त्याने ही गोष्ट त्याने आपल्या साथीदारांशी बोलून दाखवली होती. मात्र, सर्व काही अस्पष्टच होते. त्यानंतर त्याने गोव्यातील सराफी दुकानांची रेकी सुरू करून अखेर मडगाव येथे लक्ष्य केंद्रीत केले. त्यानंतर ग्राहकांची वर्दळ नसलेल्या दुकानांची माहिती मिळवली व गेल्या ऑगस्टमध्येच स्वप्नील वाळके यांचे कृष्‍णी ज्वेलर्स यावर निशाणा पक्का केला, असे आतापर्यंत तपासात पुढे आले आहे अशी माहिती पोलिस सूत्राने दिली.

संबंधित बातम्या